डोंबिवली – दिल्लीची सत्ता कणकखरपणे सांभाळण्याची क्षमता महाराष्ट्रातील मराठी नेत्यांमध्ये आहे. यापूर्वी असे तख्त सांभाळण्याचे काम, दिल्लीच्या सत्तेला भक्कमपणे आधार देण्याचे काम महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी खंबीरपणे केले आहे. त्यामुळे यापुढील पंतप्रधान हा महाराष्ट्रीयन असला पाहिजे, अशी ठाम भूमिका घेत डोंबिवलीतील एका सेवानिवृत्त प्राध्यापकाने महाराष्ट्राच्या विविध भागात जनजागृती दौरा सुरू केला आहे.
प्राध्यापक शिवा अय्यर असे या प्राध्यापकाचे नाव आहे. मागील दहा ते पंधरा वर्षाच्या कालावधीत त्यांनी समाज जागृतीचे अनेक उपक्रम राबविले आहेत. मॉडल महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. पर्यावरण संवर्धन, शासनाच्या चुकीच्या धोरणांविरुध्द यापूर्वी त्यांनी डोंबिवली ते मंत्रालय अशा पदयात्रा काढल्या आहेत. उपक्रमशील प्राध्यापक म्हणून प्रा. अय्यर यांना ओळखले जाते.
आतापर्यंत गुजरात राज्याला चार वेळा भारत देशाचे पंतप्रधान पद भूषविण्याचा मान मिळाला. उत्तरप्रदेशने सर्वाधिक म्हणजे ११ वेळा हा मान मिळवला. महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये ही पदे भूषविण्याची क्षमता आहे. महाराष्ट्रीयन नेत्याला यापुढचे पंतप्रधान पद मिळालेच पाहिजे. पंतप्रधान पदाची नियुक्ती यापुढील काळात स्वच्छ चारित्र्याच्या पात्र राजकीय नेत्याप्रमाणे चक्राकार पध्दतीने करावी या मागणीसाठी प्रा. शिवा अय्यर राज्यव्यापारी दौरे करत आहेत. त्यांच्या सोबतीला त्यांचा कार्यालयीन साहाय्यक विनय नांदुरकर आहेत. हे दौर रेल्वे, राज्य परिवहन महामंडळाची बस, रिक्षा या साधनांमधून सुरूआहेत. सनदशीर, शांततेने हा दौरा सुरू आहे.
२० जूनपासून आपण राज्यव्यापी दौऱ्याला सुरूवात केली आहे. सोबत जनजागृतीचा फलक आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, दुसऱ्या टप्प्यात धुळे, नंदुरबार, जालना, औरंगाबाद, जळगाव, त्यानंतर नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूर अशाप्रकारे राज्यातील ३६ जिल्हे आपण येत्या दोन महिन्याच्या कालावधीत फिरणार आहोत. सप्टेंबरमध्ये या मागणीसाठी आपण मुंबईत विधानभवनासमोर बसणार आहोत, असे प्रा. अय्यर यांनी सांगितले. आता ते परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये आहेत.
स्वखर्चाने हा दौरा करत आहोत. गाव, शहर परिसरातील रेल्वे स्थानके, बस आगार, बाजारपेठेची ठिकाणे जनजागृतीसाठी निश्चित केली आहेत, असे प्रा. अय्यर यांनी सांगितले. यापूर्वी महाराष्ट्रातील अर्थतज्ज्ञ सी. डी. देशमुख, यशवंतराव चव्हाण अशा अनेक नेत्यांनी दिल्लीत आपला प्रभाव पाडला आहे. दूरदृष्टीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात पंतप्रधान पद भूषवण्याची क्षमता आहे. अण्णा हजारे यांच्या पुढाकाराने झालेल्या माहिती अधिकार कायद्याने देशभर प्रशासन यंत्रणांवर वचक निर्माण केला आहे. मेधा पाटकर यांच्या सरदार सरोवर प्रकल्प आंदोलनामुळे जमीन भूसंपादनविषयक शासनाला धोरणात्मक निर्णय घ्यावे लागले. अशी दूरदृष्टीची विचारवंत माणसे महाराष्ट्रात असताना राज्याला देशाचे पंतप्रधान पद का मिळू नये. हा प्रश्न उपस्थित करत आपण जनजागृती करत आहोत.
महाराष्ट्रात दूरदृष्टीची कणखर काही राजकीय नेतृत्व आहेत. यापूर्वी महाराष्टाने देशाच्या सत्तेत महत्वाची भूमिका बजावली आहे. मग पंतप्रधान पदासासाठी महाराष्ट्रावर अन्याय का. असा प्रश्न करत यापुढचा पंतप्रधान महाराष्ट्रीय असावा यासाठी आपण राज्यभर जनजागृती दौरा करत आहोत. – प्रा. शिवा अय्यर, प्रचारक, डोंबिवली.