बदलापूर: महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. बदलापुरात एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. राज्यात प्रत्येक तालुक्यात १२५ वसतिगृह उभारण्यासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचेही शिरसाट यांनी सांगितले आहे.

बदलापूर शहरात ३ मे १९२७ रोजी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी शिवजयंती निमित्त हजेरी लावली होती. या भेटीचा स्मृतिदिन आणि ती शिवजयंती आजही बदलापुरात साजरी केली जाते. या कार्यक्रमाचे आयुक्त साधून बदलापूर शहरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उपस्थित होते. यानिमित्त बोलताना त्यांनी राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तालुक्यात एक असे १२५ वसतिगृह उभारण्यात येणार असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली आहे. यासाठी १५०० कोटी रुपयांचा निधीही मंजुर करण्यात आले आहे, असेही शिरसाट म्हणाले.

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील वसतिगृहाची आपण आवर्जून पाहणी केली. त्यांनंतर विद्यार्थ्यांना चांगल्या सोयीसुविधा व उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी हा निर्णय घेतल्याचे शिरसाट म्हणाले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात वस्तीगृह उभारले जाणार असल्याने गोरगरिब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वासही शिरसाट यांनी व्यक्त केला.

भीमा कोरेगाव येथे सोयीसुविधा

संजय शिरसाट यांनी भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला मानवंदना देण्याच्या एक दिवसाच्या कार्यक्रमासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून खर्च केल्या जाणाऱ्या निधीवरूनही परखड मत व्यक्त केले. शिरसाट म्हणाले की, दरवर्षी येथे साडे चौदा कोटी रुपये खर्च केले जात होते. मात्र इतर दिवशी तिथे कोणत्याही सोयीसुविधा नसायच्या. त्यामुळे आपण भीमा कोरेगाव विजय स्तंभ परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेतला, असेही शिरसाट म्हणाले. त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आता हे काम सुरू होणार असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले.

बाबासाहेबांमुळेच मंत्रिपद

बाबासाहेब पाहता आले नाही, अनुभवता आले नाही पण त्यांनी केलेल्या कार्यामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस मंत्रिपदापर्यंत पोहचला, अशा अशा भावना संजय शिरसाट यांनी व्यक्त केल्या. बाबासाहेब नसते तर आरक्षण नसते, आरक्षण नसते तर मी नगरसेवक,आमदार आणि मंत्री झालो नसतो. हा बदल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे शक्य झाला असेही मंत्री संजय शिरसाट म्हणाले.