कल्याण पश्चिमेत सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या विभागाचा महावितरणचा वीज पुरवठा गेल्या वीस तासापासून गायब असल्याने व्यापारी, व्यावसायिक हैराण आहेत. सणासुदीच्या दिवसात वीज पुरवठा खंडित झाल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

वीज पुरवठा खंडित झाल्यापासून स्थानिक व्यापाऱ्यांनी महावितरणच्या स्थानिक कर्मचारी, अधिकाऱ्यांना संपर्क केले. पण वीज पुरवठा लवकरच सुरळीत होईल अशीची कारणे देण्यात येत होती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात ठाण्या नंतरचा सर्वात मोठा सराफ बाजार कल्याणमध्ये आहे. शिवाजी चौक ते महम्मद अली चौक दरम्यानच्या सराफ बाजारात सोने, चांदी आणि इतर ऐवज खरेदी करण्यासाठी ठाणे जिल्ह्यासह नाशिक आणि इतर जिल्ह्यांमधून नागरिक खरेदीसाठी येतात.

सणासुदीचे दिवस सुरू आहेत. नागरिक सणाचे औचित्य साधून खरेदीसाठी बाहेर पडलेले असतात. हे नागरिक खरेदीसाठी दुकानात येतात. त्यावेळी वीज पुरवठा नसेल तर त्यांना पारख करून सोने, चांदीचा ऐवज घेता येत नाही. गुरुवारपासून आमच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना किमती ऐवज वीजे अभावी पारखून घेता येत नसल्याने अनेक ग्राहकांनी आम्ही नंतर येतो सांगून दुकानातून काढता पाय घेतला, असे सराफ बाजारातील काही सराफांनी सांगितले.

सराफ बाजारालगत झुंझारराव बाजारात धान्य आणि इतर घाऊक मालाची मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणी कल्याण शहर परिसरातील घाऊक व्यापारी खरेदीसाठी येतात. या बाजारात वीज नसल्याने अंधार आहे. त्यामुळे सामान काढण्यासाठी आम्हाला गोदामात जाता येत नाही. गोदामात, दुकानाच्या आतील भागात वीज नसल्याने हमाल सामान बाहेर काढण्यास तयार होत नाही, अशा तक्रारी घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी केल्या.

कल्याण शहरातील महत्वाच्या बाजारपेठेतील वीज पुरवठा वीस तासाहून अधिक काळ बंद आहे आणि यासाठी महावितरणकडून कोणतीही हालचाली केली जात नसल्याने कल्याण ज्वेलर्स संघटनेचे सचिव वीरेंद्र मुथा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बाजारपेठेत नेहमीच वीजेचा लपंडाव असतो. गणेशोत्सव, ईद सण सुरू आहे.

ग्राहक अधिक संख्येने खरेदीसाठी बाहेर पडतात. दुकानात आल्यावर वीज नाही पाहून ते सोने, चांदीचा ऐवज पारखून घेता येणार नाही म्हणून निघून जात आहेत. यामध्ये अनेक सराफांचे आर्थिक नुकसान होत आहे, असे सचिव वीरेंद्र मुथा यांनी सांगितले. महावितरणची देखभाल दुरूस्तीची कामे नेहमी सुरू असतात. तरी ऐन सणाच्या काळात त्यांचा वीज खंडित होतोच कसा. वीज पुरवठा खंडित झाला तरी तो तत्परतेने सुरू करण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत नाहीत याचे आश्चर्य सर्व व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. हा प्रकार कायमस्वरुपी थांबला नाहीतर दुकाने, बाजारपेठा बंद ठेऊन व्यापारी रस्ता रोको आंदोलन केल्या शिवाय राहणार नाहीत, असा इशारा सचिव वीरेंद्र मुथा यांनी प्रशासनाला दिला आहे.