ठाणे – ठाणे शहरातील ठाणे स्थानक परिसरालगत असलेल्या कोपरी भागात एका गॅरेजला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ही आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. तब्बल एक तासाच्या अवधीनंतर ही आग अटोक्यात आण्यात ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आणि अग्निशम दलाच्या जवानांना यश आले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

कोपरी परिसर ठाणे पूर्वेकडे येत असून ठाणे स्थानक परिसरालगतच हा परिसर आहे. स्थानक परिसरा बाजूलाच हा परिसर असल्यामुळे दिवसभर याभागात मोठ्याप्रमाणात रहदारी सुरु असते. तसेच याभागात मोठ्यासंख्येने खाद्यविक्रिचे, कपड्याचे असे विविध दुकाने असून हा बाजारपेठ परिसर आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांची देखील याठिकाणी रेलचेल सुरु असते. कोपरी भागात मोठ्याप्रमाणात कपडा मार्केट आहे. या कपडा मार्केटमध्ये सोनू ऑटो पार्टस अँड गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये दिवसभर अनेकजण आपली वाहने दुरुस्तीसाठी घेऊन येतात.

सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अचानक या गॅरेजमध्ये आग लागली. ऐन सकाळच्या वेळी आणि तेही भर रहदारीच्या ठिकाणी ही आग लागल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. परिसरात भितीचे वातावरण पसरले. तात्काळ या घटनेची माहिती एका व्यक्तीने ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली.

माहिती मिळताच, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कोपरी अग्निशमन केंद्र अधिकारी, कोपरी पोलीस कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहनासह आणि एक जेसीबी मशिनसह अग्निशमन दलाचे जवान ०२-फायर वाहनासह, ०१-रेस्क्यू वाहनासह, ०१-वॉटर टँकरसह घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनास्थळी लागलेली आग आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर पूर्णपणे विझविण्यात आली.

सुदैवाने या घटनेत कोणतिही जिवीतहानी झालेली नाही. परंतू, नेमकी ही आग कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. तरी, आता परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगीमुळे कसे झाले नुकसान

या गाळामध्ये आग लागल्यामुळे गाळ्यातील सहा भंगार दुचाकी वाहने, दोन लाकडी कपाटे, तीन लोखंडी रॅक, प्रत्येकी एक लिटरचे पंधरा इंजिन ऑइलचे डब्बे तसेच गाळ्यातील प्लास्टिक आणि लाकडी भंगार, इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.