डोंबिवली- येथील एमआयडीसीच्या खंबाळपाडा भागातील रामसन आणि प्राज डाईंग या दोन कंपन्यांना बुधवारी मध्यरात्री एक वाजता भीषण आग लागली. आगीमुळे जीवित हानी झाली नाही. मात्र दोन्ही कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

या कंपन्याच्या परिसरात महानगर पंप होता. या पंपाला आगीची झळ लागली तर मोठा अनर्थ उद्भवणार होता. या पंपापर्यंत आगीच्या झळा, ज्वाला पसरणार नाहीत याची विशेष काळजी अग्निशमन दलाच्या जवानांनी घेतली. बुधवारी मध्यरात्री एक वाजताच्या दरम्यान बाहेर फटाके फुटल्यासारखे सतत मोठे आवाज येऊ लागले म्हणून डोंबिवली, खंबाळपाडा परिसरातील रहिवासी जागे झाले. त्यांना आकाशाच्या दिशेने झेपावणाऱ्या पाच ते सहा किलोमीटर उंचीच्या आगीच्या ज्वाला दिसल्या. ज्वालांमुळे कंपनी परिसरातील दोन ते तीन किमी परिसरातील इमारती उजळून निघाल्या होत्या.

हेही वाचा >>> उंबरमाळी रेल्वे स्थानका जवळ रेल्वे मार्गाजवळ खड्डा पडल्याने कसारा-सीएसएमटी वाहतूक ठप्प

आगीमुळे परिसरातील कंपन्या, महानगर गॅसला धोका निर्माण होण्याची शक्यता आणि दोन्ही कंपन्यांना आगी लागल्यामुळे आगीची तीव्रता वाढणार होती. ‘कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशन’चे अध्यक्ष देवेन सोनी यांनी तातडीने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, प्रांत अभिजीत भांडे-पाटील यांना संपर्क केला. तातडीने अग्निशमन दलाच्या इतर भागातील वाहने पाठविण्याची मागणी केली. तोपर्यंत कल्याण डोंबिवली पालिका अग्निशमन दलाचे सहा बंब आणि जवान आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. कामा संघटनेचे आपत्कालीन पथक याठिकाणी सक्रिय होते. जिल्हाधिकाऱ्यांनी भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर पालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क करुन तातडीने डोंबिवलीत बंब पाठविण्याच्या सूचना केल्या. वेगळ्या भागातून १० अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

डोंबिवली एमआयडीसीत दोन कंपन्यांना लागलेली भीषण आग.

उपविभागीय अधिकारी भांडे-पाटील रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी केलेल्या सूचना, नियोजन पध्दतीने एकाचवेळी दोन्ही कंपन्यांच्या आगीवर चारही बाजुने पाण्याचा मारा करण्यात आला. वाऱ्यामुळे आगीचा वेग अधिक असल्याने आग विझविताना जवानांची दमछाक होत होती. १५ हून अधिक बंब पहाटे पाच वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम करत होते. सकाळी सहा वाजता आग पूर्ण आटोक्यात आली. त्यानंतर तेथील राखेवर पाणी मारण्याचे काम जवानांनी सुरू केले होते. शॉट सर्किट मुळे आग लागण्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामसन कंपनीत सुगंधी द्रव्ये (परफ्युम), प्राज डाईंग कंपनीत कपड्यांना रंग देण्याचे काम केले जाते, असे ‘कामा’ संघटनेचे अध्यक्ष सोनी यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यात चार ते पाच कंपन्यांना आग लागल्याच्या घटना डोंबिवली एमआयडीसीत घडल्या आहेत. मार्च महिना आला की औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना आगी का लागतात, असे प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित केले जातात.