Mama Pagare Update News डोंबिवली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साडी नेसलेली प्रतिमा समाज माध्यमांत का प्रसारित केली. ती प्रतिमा प्रसारित करण्याची तुमची लायकी आहे का, असे प्रश्न करत भाजप डोंबिवली पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे डोंबिवलीतील ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांना भर रस्त्यात नवाकोरा शालू नेसवला होता. याप्रकरणी आपणास रस्त्यात अडवून भाजप पदाधिकाऱ्यांनी जबरदस्तीने आपणाशी गैरवर्तन केले म्हणून मामा पगारे यांनी भाजपच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांच्या विरुध्द गुरूवारी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

काँग्रेसचे डोंबिवलीतील ज्येष्ठ नेते मामा पगारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, संदीप माळी, दत्ता मयेकर आणि इतर २० जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करून घेतला. रस्त्यात रोखून धरणे, गुन्हेगारी पध्दतीने धाकदपटशा दाखवत गैरवर्तन करणे, प्रतिमा मलीन करणे या कलमाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मामा पगारे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की मी डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी भागात कुटुंबीयांसह राहतो. मी कल्याण शहर जिल्हा काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे. काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर फिरत असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची साडी नेसलेली प्रतिमा आपण परिचितांना सामाईक केली होती. त्यानंतर संदीप माळी यांच्या मोबाईलवरून मला संदीप पाटील बोलतो सांगून संपर्क करण्यात आला. एका इमारतीच्या विकासासंदर्भात तुमची मदत हवी आहे. त्यासाठी तुमच्या भेटीची वेळ पाहिजे अशी विचारणा करण्यात आली. उद्या भेटू असे मी समोरच्याला सांगितले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी पावणे बारा वाजता मला मोबाईलवरून फोन आला. तुम्ही कोठे आहात. आमच्या सोबत विकासक आहे. त्यांना तात्काळ तुम्हाला भेटायचे आहे. आपण डाॅक्टरकडे डोळे दाखविण्यासाठी चाललो आहोत. त्यानंतर भेटतो असे सांगितले. समोरील इसमांनी मला अगोदर आम्हाला भेटा, मग दवाखान्यात जा असे सांगितले. मी मानपाडा रस्त्यावरील गावदेवी मंदिराजवळील वेलनेस मेडिकल स्टोअर्सजवळ उभा असताना तेथे भाजपचे नंदू परब, संदीप माळी, दत्ता मयेकर आणि इतर २० जण आले. त्यांनी आपणास रस्त्यात अडवून त्यामधील दोन दोघांनी माझे हात धरले. त्यानंतर दोन व्यक्ति मला साडी नेसवू लागल्या.

मोदींची साडी नेसलेली प्रतिमा प्रसारित करण्याची तुमची लायकी आहे का, असे प्रश्न मला करू लागले. मला साडी नेसवत असताना भाजप पदाधिकाऱ्यांनी मोबाईलमधून माझे चित्रण केले आणि ते समाज माध्यमांत प्रसारित केले. या सगळ्या प्रकाराने माझी समाजात बदनामी आणि मानहानी झाली. तसेच, मला या सगळ्या प्रकाराने मानसिक धक्का बसला आहे. म्हणून आपली भाजपच्या पदाधिकाऱ्यांंविरुध्द तक्रार आहे, असे मामा पगारे यांनी तक्रारीत म्हटले आहे. यावेळी काँग्रेस पदाधिकारी ॲड. नवीन सिंग, कांचन कुलकर्णी उपस्थित होते.

यासंदर्भात कल्याण जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले, भाजप पदधिकाऱ्यांवर आम्ही ॲट्राॅसिटी दाखल करण्याची मागणी केली आहे. अख्खा गृह विभाग त्यांचा आहे. त्यामुळे आमची ॲट्राॅसिटीची तक्रार दाखल करून घेतली नाही.