लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: मागील काही दिवसांपासून कल्याण पूर्व विधानसभेचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांची समाज माध्यमांत बदनामी करणाऱ्या कल्याण पूर्व भागातील जरीमरी भागातील एका तरुणाला कोळसेवाडी पोलिसांनी रविवारी अटक केली. या बदनामी प्रकरणावरुन आ. गायकवाड यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. चंदन सुभाष शिर्सेकर (२८, रा. चारवेदी चाळ, जरीमरीनगर, कोळसेवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो ओला कार चालक आहे.

पोलिसांनी सांगितले, आरोपी चंदन शिर्सेकर याने आ. गायकवाड यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडले होते. या खात्यावरुन चंदन कल्याण मधील महिलांना मित्र होण्यासाठी फेसबुकवरुन संदेश पाठवायचा. आ. गायकवाड यांच्याकडून अशाप्रकारचे संदेश का येतात म्हणून महिला आ. गायकवाड यांच्या कार्यालयात जाऊन यासंदर्भात विचारणा करत होत्या. तेव्हा अशाप्रकारचे संदेश आपण पाठवत नाहीत, असे आमदार सांगत होते.

आणखी वाचा-कल्याण: शिळफाटा रस्त्यावरील गतिरोधक हटविल्याने वाहने सुसाट

आपल्या नावाने कोणीतरी हा प्रकार करत असावा, म्हणून आ. गायकवाड यांनी समाज माध्यमांत होणाऱ्या बदनामी बद्दल ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक उल्हास जाधव, हरिदास बोचरे यांच्या पथकाने तांत्रिक माहितीचा आधार घेऊन आरोपीचा शोध सुरू केला होता. हा तपास करत असताना आरोपी हा कल्याण पूर्वेतील जरीमरीनगर मध्ये राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला सापळा लावून रविवारी अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपण या बदनामी प्रकरणात अडकले जाऊ नये म्हणून चंदन दुसऱ्याचा वायफायचा वापर करत होता. पोलिसांना त्याचा शोध घेताना अडचणी येत होत्या. आरोपी चंदनने हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरुन केला आहे का. त्याला यात काही आर्थिक फायदा झाला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.