लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : पतीच्या निवृत्ती वेतनाचे १२ हजार रुपये घरातून अचानक गायब झाल्याने शिवीगाळ आणि संशय घेणाऱ्या ७७ वर्षीय आजीची तिच्या २० वर्षीय नातवाने वरवंट्याने ठेचून हत्या केली. अभि चौहान असे हत्याप्रकरणातील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अभि याच्याविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

वागळे इस्टेट येथील साठेनगर भागातील एका चाळीमध्ये दयावती चौहान (७७) या वास्तव्यास होत्या. त्यांच्या वरील मजल्यावरील घरामध्ये अभि चौहान हा त्याच्या आई आणि बहिणीसोबत राहातात. दयावती यांचे पती सैन्य दलात होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या निवृत्ती वेतनाचे १२ हजार रुपये दयावती यांना मिळत होते. काही दिवसांपूर्वी त्या निवृत्ती वेतनाचे पैसे घेऊन आल्या होत्या. त्यांनी ते पैसे घरामध्ये कुठेतरी ठेवले होते. परंतु हे पैसे अचानक गायब झाले. त्यामुळे दयावती या वारंवार अभि यांच्यावर सशंय घेऊन त्यांना शिवीगळ करत असे.

आणखी वाचा-ठाणे पालिकेची कचरा विल्हेवाटीसाठी पाऊले; भिवंडीतील आतकोलीच्या जागेवर कचऱ्यापासून कोळसा, वीज निर्मीतीचा प्रकल्प

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अभि हा दयावती यांच्या घरात गेला. त्याने घराचे दार आतून बंद केले. त्यानंतर त्याने आजीला मारहाण करण्यास सुरूवात केली. परिसरातील नागरिक आणि अभिचे कुटुंबीय आजीला मारहाण करू नको अशी विनवणी करत होते. परंतु अभि कोणाचेही ऐकत नव्हता. अखेर त्याने घरातील वरंवटा घेऊन दयावती यांची ठेचून हत्या केली. त्यानंतर तो दरवाजा उघडून बाहेर पडला. परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती श्रीनगर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अभि याला ताब्यात घेतले. दयावती यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.