कल्याण : कल्याणमध्ये एका महिलेचा विनयभंग एका इसमाने केला. याप्रकरणी पीडित महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांंनी तातडीने तपास करून गुन्हा दाखल इसमा विरुध्द सहा तासाच्या अवधीत कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. गेल्या तीन दिवसापूर्वी कोळसेवाडी, बाजारपेठ आणि मानपाडा पोलिसांनी अशाच प्रकरणांमध्ये तपास करून ४८ तासात न्यायालयात आरोपींविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते.

कल्याण परिमंडळातील पोलिसांनी विनयभंग प्रकरणी दाखल गुन्ह्यांचा तातडीने तपास करून न्यायालयांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्याचा धडाका लावल्याने दाखल गुन्ह्यातील इसमांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांंनी याप्रकरणी आदेश दिले आहेत.

कल्याणमध्ये राहत असलेल्या एका ३० वर्ष वयाच्या महिलेच्या घरात मुंबईतील वडाळा भागात राहत असलेला ओमकार विक्रांत निकाळजे (२९) हा शिरला. घरातील संबंधित महिलेचा विनयभंग केला. या महिलेने प्रतिकार केल्यानंतर ओमकार घरातून पळून गेला. या प्रकाराने अस्वस्थ झालेल्या महिलेने तात्काळ खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलसांनी ओमकार निकाळजे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला.

खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पवार यांनी पीडित महिलेच्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास केला. या गुन्ह्यात तथ्यांश बघून उपनिरीक्षक पवार यांनी सहा तासात तपास पूर्ण करून ४५ पानांचे दोषारोपत्र या गुन्ह्यातील इसम ओमकार निकाळजे विरुध्द कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लैंगिक अत्याचार, विनयभंग प्रकरणातील आरोपींना झटपट कठोरात कठोर शिक्षा झाल्या पाहिजेत. असे गुन्हे करण्यासाठी पुन्हा कोणी धजावले नाही पाहिजे. यासाठी अशा गुन्ह्यांचा तपास तत्परतेने करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्याची जलद कार्यवाही पूर्ण केली जात आहे. खडकपाडा प्रकरणातील गुन्ह्याचा तपास सहा तासात पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. कल्याणजी घेटे साहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण.