Manoj Jarange Patil Mumbai Protest : ठाणे : मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांसाठी जेवण घेऊन निघालेल्या वाहनांना ठाणे आणि मुंबई शहराच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर नाका येथे पोलिसांनी अडविली. यामुळे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत घोषणाबाजी सुरू केल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. मराठा आंदोलकांनी हा अन्यायकारक प्रकार असल्याचे सांगत या घटनेचे निषेध नोदवून घोषणाबाजी सुरू केली आणि त्यानंतर पोलिसांनी ही वाहने सोडली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. यात मराठवाडा आणि विदर्भ मधील मराठा आंदोलकांचा सहभाग सर्वात जास्त आहे. या भागातील मराठा बांधव हे ठाण्याच्या माजीवडा मानपाडा आणि विटावा या भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे.
या भागातील घराघरातून आंदोलकांसाठी चटणी, भाजी, भाकर देण्यात येत आहे. हे जेवण घराघरातून गोळा करून ते वाहनाने मुंबईतील आंदोलकांपर्यंत पोहचविण्याचे काम मराठा समाजाचे कार्यकर्ते करत आहेत. कल्याणमधील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारपासून मुंबईत अन्नछत्र सुरू केले आहे.
कल्याणच्या बाजारातून भाजीपाला तसेच इतर साहित्य मुंबईत सकाळी नेण्यात येते आणि तिथेच जेवण बनवून मराठा आंदोलकांना देण्यात येत आहे. पावसामुळे अन्नछत्रसाठी मुंबई तात्पुरती शेड उभारण्यात आली आहे. ठाणे शहराच्या वागळे इस्टेट परिसरात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. या भागातून मुंबईतील मराठा आंदोलकांना फळ, बिस्कीट आणि पाणी असा पुरवठा करण्यात येत आहे.
वाहने रोखल्याने संताप मुंबईतील आझाद मैदान येथे जमलेल्या मराठा आंदोलकांसाठी ठाणे शहरातून मराठा समाजाचे कार्यकर्ते घराघरातून चटणी, भाकर, चपाती असे अन्न पदार्थ गोळा करून सोमवारी दुपारी मुंबईच्या दिशेने जात होती. ही वाहने ठाणे आणि मुंबईच्या वेशीवरील आनंदनगर नाक्याजवळ येताच मुंबई पोलिसांनी ही वाहने अडवून धरली. यामुळे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत घोषणाबाजी सुरू केल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. मराठा आंदोलकांनी हा अन्यायकारक प्रकार असल्याचे सांगत या घटनेचे निषेध नोदवून घोषणाबाजी सुरू केली आणि त्यानंतर पोलिसांनी ही वाहने सोडली, अशी माहिती मराठा मोर्चाचे पदाधिकारी पांडुरंग भोसले यांनी दिली.