Manoj Jarange Patil Mumbai Protest: ठाणे : मराठा समाजासाठी ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. या निर्णायक लढ्याला राज्यभरातून मराठा बांधवांचा मोठा पाठिंबा मिळत असून, ठाण्यातील मराठा समाजही सज्ज झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठीचा आवाज ठाण्यातूनही बुलंद होणार आहे.
ठाण्यातील मराठा मंडळाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत, आंदोलनासाठी येणाऱ्या हजारो आंदोलनकर्त्यांच्या भोजन, पाणी आणि निवास व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषतः नाशिक मार्गे मुंबईत येणाऱ्या आंदोलनकर्त्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा ठाणेकर मराठा कार्यकर्त्यांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या बैठकीत ठाण्यातील अनेक मराठा कार्यकर्त्यांनी भाग घेतला. २४ ऑगस्ट रोजी ठाण्यात झालेल्या सकल मराठा समाजाच्या तातडीच्या बैठकीत ही योजना ठरविण्यात आली.
ही निर्णायक वेळ
मनोज जरांगे यांना न्यायालयाने उपोषणासाठी मनाई केली असली, तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम असून, आरक्षणासाठी आरपारची लढाई करण्यास तयार आहेत. त्यांच्या या निर्धाराला ठाण्यातील मराठा समाजाने साथ द्यायला हवी, अशी चर्चा बैठकीत झाली. ही लढाई सर्व मराठा समाजाची आहे. आता सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे. चूक-भूल द्यावी-घ्यावी” या तत्त्वावर एकत्र येऊन, ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी ही निर्णायक वेळ आहे,” असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
मुंबई येण्यास परवानगी पण, ही अट
मुंबईत येण्यावर ठाम असलेल्या मराठा आंदोलकांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्यांना केवळ एकच दिवस आंदोलन करता येईल, अशी प्रमुख अट ठेवली आहे. याशिवाय मनोज जरांगे यांना आंदोलनस्थळी केवळ पाच वाहने आणण्याची आणि केवळ पाच हजार आंदोलकांसह आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे.
सुमारे १० हजार आंदोलक येण्याची शक्यता
मराठा समाज नेते डॉ. पांडुरंग भोसले यांनी सांगितले की, ” आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील अनेक नेत्यांकडून मागील काही दिवसांपासून विभागनिहाय बैठका घेऊन अधिकाधिक सहभागाचे आवाहन करण्यात येत आहे. ठाणेकर मराठा समाजही यात मागे राहू नये म्हणून एकदिलाने पुढे सरसावत आहे. ठाणे शहरातून आणि नाशिकमार्गे येणाऱ्या आंदोलनकर्त्यांसाठी आनंदनगर चेक नाका येथे नाश्ता व जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. सुमारे १०,००० आंदोलनकर्ते येणार असल्याचा अंदाज आहे.”
ठाण्यातील नियोजनाचे ठळक मुद्दे:
आंदोलनकर्त्यांसाठी आनंदनगर चेक नाका येथे नाश्ता व जेवण
शहरातील ठिकठिकाणी बॅनर लावून जनजागृती
श्रीमंत मराठा बांधवांकडून अर्थसाह्याचे आवाहन
आंदोलन स्थळी पोहोचण्यासाठी वाहनांची व्यवस्था