कल्याण : कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील नांदिवली तर्फ हद्दीतील बालरोगतज्ज्ञ डाॅ. अनिकेत पालांडे यांच्या श्री बाल चिकित्सालयातील स्वागतिकेला बेदम मारहाण करणाऱ्या गोकुळ झा या इसमाला मानपाडा पोलिसांनी मंंगळवारी रात्री उशिरा अटक केली आहे, अशी माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. रुग्णालयात स्वागतिकेला मारहाण केल्यानंतर गोकुळ झा फरार झाला होता. स्वागतिका मराठी भाषिक आहे. झा हा बिहारचा रहिवासी आहे.
एका परप्रांतियाने एका मराठी तरूणीला मारहाण केल्याने मनसे, भाजप, शिवसेना नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत गोकुळ झाला तात्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. मनसेचे कार्यकर्ते मंगळवारी दुपारपासून कल्याण परिसरात गोकुळचा शोध घेत होते. त्याला पहिले चोप द्यायचा आणि मगच त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याचे नियोजन मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांंनी मंगळवारी रात्री मानपाडा पोलीस ठाण्यात उपायुक्त झेंडे यांची भेट घेतली. या घटनेची माहिती घेऊन मारहाण करणाऱ्या इसमाला तातडीने अटक करण्याची सूचना केली होती. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, मनसेचे नेते राजू पाटील यांनी झाला अटक करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती.
मराठी आणि परप्रांतीय असे वळण या प्रकरणाला मिळाल्याने पोलिसांवरील दबाव वाढला होता. पोलिसांनी पहिले गोकुळच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी विशेष तपास पथके तयार करून मंगळवारी रात्री कल्याण परिसरातून गोकुळ झाला अटक केली. गोकुळ झा हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्यावर विठ्ठलवाडी, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यासाठी त्याने यापूर्वी हत्याचाराचा वापर केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. अलीकडेच एका गुन्ह्याप्रकरणी तो जामिनावर बाहेर आला होता. त्याचे इतर दोन तीन साथीदार ताब्यात आहेत.
स्वागतिकेला बेदम मारहाण झाल्याने ती अत्यवस्थ आहेत. डाॅक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. अनन्या झा ही महिला आपल्याला बाळाला घेऊन रुग्णालयात आली होती. तिच्या सोबत तिचे इतर नातेवाईक होते. त्यामध्ये गोकुळ झाचा समावेश होता. स्वागतकीने अनन्या झा आणि गोकुळ यांना डाॅक्टर दालनात जाण्यास रोखल्याने त्याचा राग अनावर झाला. त्याने शिवीगाळ करत स्वागतिकेला बेदम मारहाण केली. स्वागतकीने पोलीस ठाण्यात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
मुख्य आरोपी गोकुळ झाला नागरिकांच्या सतर्कतेमुळे अटक केली आहे. त्याचे इतर दोन साथीदार भाऊ रणजित झा आणि इतर दोन जण ताब्यात आहेत. त्यांच्या सोबतच्या महिला पोलिसांच्या ताब्यात आहेत. गोकुळला बुधवारी सकाळी न्यायालयात हजर केले जाईल. त्यानंतर त्याच्या या गुन्ह्यातील सहभागाची चौकशी केली जाईल. सीसीटीव्ही चित्रणातून सहभागी इसमांचा शोध घेतला जात आहे.
अतुल झेंडे पोलीस उपायुक्त