ठाणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी ठाणे शहरात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. त्याचबरोबर दोन कार्यकर्त्यांनी याठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनास सोमवारी सकाळी रिपाइं एकतावादी या पक्षाने पाठींबा दिला आहे. राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र झाली असून, नेत्यांना गावबंदीचे लोण अनेक जिल्ह्यात पसरले आहे.

हेही वाचा >>> कल्याण लोकसभेसाठी भाजपा कार्यकर्त्यांच्या मनातील उमेदवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. अशाचप्रकारे ठाण्यात मराठा समाजाच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात साखळी उपोषण सुरू केले आहे. या साखळी उपोषणाला पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी मराठा क्रांती मोर्चाचे दत्ता चव्हाण हे बसले होते. त्यानंतर दुसऱ्यादिवशी डाॅ. पांडुरंग भोसले तर तिसऱ्या दिवशी संजय नेरकर हे बसले होते. त्याचबरोबर धीरेंद्र शिंदे आणि शिवाजी शिंदे या दोन कार्यकर्त्यांनी याठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

हेही वाचा >>> भाजपा नेत्यांची पाठ फिरताच डोंबिवलीतील फडके रस्त्याला फेरीवाल्यांचा विळखा, रस्त्याच्या दुतर्फा रस्ते अडवून ठेले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सकल मराठा समाजाचे अध्यक्ष रमेश आंब्रे यांच्यासह इतर समाजाचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनाला दिवसेंदिवस विविध समाज, संघटनांचा पाठींबा मिळताना दिसून येत आहे. या आंदोलनाला धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पाठिंबा दिला. त्यापाठोपाठ रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जितेंद्रकुमार इंदिसे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ते मराठ्यांच्या साखळी उपोषणात सहभागी झाले. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केंद्र सरकारने मराठ्यांच्या हिताशी खेळ सुरु केला आहे. संविधानातील कलम ३४० नुसार आरक्षण देणे शक्य असतानाही केंद्र सरकार सूची तयार करीत नाहीत. आमच्या मराठा बांधवांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार या सरकारला कोणी दिला आहे, असा प्रश्न जितेंद्रकुमार इंदिसे यांनी यावेळी उपस्थित केला.