Manoj Jarange Patil Mumbai Protest नवी मुंबई : ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असताना ठाणे, नवीमुंबई असे सर्वत्र ठिकाणी राहणाऱ्या सामाजिक संघटनांकडून त्यांना विविध माध्यमातून मदतीचा हात दिला जात आहे. परंतू, मदत करणाऱ्यांची पोलीस अडवणूक करत असल्याचा गंभीर आरोप ठाण्यापाठोपाठ आता वाशीत मराठा बांधव करत आहेत. वाशी टोल नाक्याजवळ आंदोलकांच्या गाड्या अडविल्या जात आहेत.

इतर मागासवर्गीय समाजाच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याचा आदेश निघेपर्यंत माघार नाही, या भूमिकेवर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे ठाम असल्याने हजारो मराठा आंदोलक हे मुंबईत ठाण मांडून आहेत. परंतू, सरकारने या आंदोलकांची पुरेशी व्यवस्था केली नसल्याने या आंदोलकांचे मोठे हाल होत आहे. मुंबईतील अनेक हाॅटेल बंद आहेत. त्यामुळे या आंदोलकांना दोनवेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. पिण्यासाठी पाणी नाही, जेवण नाही. त्यात पाऊस पडत असल्याने आंदोलकांचे मोठे हाल होत आहेत. या आंदोलकांना मदत व्हावी यासाठी आता विविध संघटना पुढे सरसावत आहेत.

ठाणे, कल्याण, नवीमुंबई याठिकाणी मोठ्याप्रमाणात मराठा बांधव आले आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध सामाजिक संस्थांकडून तसेच मराठा कुटूंबांकडून त्यांना जेवणाची व्यवस्था केली जात आहे. टेम्पो भरुन त्यांना नाश्ता, जेवण आणि फळे नेले जात आहेत. परंतु, या गाड्यांची अडवणूक होत असल्याचा आरोप काही मराठा बाधवांनी केला आहे. सुरुवातील ठाण्यात या गाड्या अडविण्यात आल्या होत्या. त्यापाठोपाठ वाशी टोल नाक्याजवळ देखील गाड्या आडविण्यात आल्या. त्यामुळे मराठा आंदोलकांना पाणी जेवण कसे मिळणार असा प्रश्न आता विचारला जात आहे.