राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी दूरचित्रवाहिनीवरील मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर ठाणे पोलिसांनी केतकी चितळे विरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने नवी मुंबई येथून केतकी चितळे हिला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमधून केतकी चितळेला अटक केल्याप्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांचं अभिनंदन केलं आहे. गेल्या सात महिन्यांपासून केतकी कळंबोलीतील अव्हेलोन इमारतीत राहत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतची तक्रार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वप्नील नेटके यांनी दिली होती. महाराष्ट्रात आतापर्यंत केतकी चितळे विरोधात एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत. केतकी चितळेनं शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर राज्यभरात राष्ट्रवादी नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून केतळी चितळेचा निषेध केला आहे.