महाराष्ट्रात मराठी भाषा बोलण्यासाठी काही जणांना लाज वाटत होती, तर काही जणांना ही सक्ती वाट होती, पण पंधरा वर्षापूर्वी मनसेने लगावलेल्या कानाखालीमुळेच राज्यात मराठी टिकली, असा दावा मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेश गडकरी रंगायतन येथे गौरव महिलांचा या कार्यक्रमाचे रविवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शर्मिला ठाकरे बोलत होत्या. राजकारणात महिलांनी आपले चांगले स्थान निर्माण केले असून महाराष्ट्रात जागतिक कीर्तीचे रत्न तयार झाले असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले.

“जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी आपण मराठीच बोलले पाहिजे. आपण मराठीमध्ये सवांद साधला तरच समोरची व्यक्ती मराठीत बोलू शकेल. त्यामुळे प्रत्येकाने आपले मराठीपण जपले पाहिजे,” असेही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

मराठी भाषेसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अनेकवेळा खळखट्याक आंदोलने केल्यानंतर विविध ठिकाणी मराठी भाषेच्या पाट्या, मराठी भाषेचा वापर होऊ लागला हे फक्त मनसेच्या कार्यकर्त्यांकडून शक्य झाले आहे. पंधरा वर्षापूर्वी मनसेने लगावलेल्या कानाखालीमुळेच हे शक्य झाले असेही त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मराठी भाषेच्या शिक्षकांचे आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मनसे मध्यवर्ती कार्यालय, विष्णूनगर येथे आयोजित केलेल्या ‘मराठी स्वाक्षरी’ कार्यक्रमाला देखील त्यांनी हजेरी लावून स्वतः मराठीत स्वाक्षरी केली.

यावेळी मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता, मनसे नेते अभिजित पानसे, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, महिला अध्यक्ष समीक्षा मार्कंडे आदी जण उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi languagein maharashtra due to mns says sharmila thackeray abn
First published on: 28-02-2022 at 12:36 IST