इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी शाळांची घसरत चाललेली पटसंख्या रोखण्यासाठी शिक्षण संस्थांनी विविध सवलती आणि उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यातील एक नामांकित शाळा असलेल्या मो. ह. विद्यालयाने गुढी पाडव्यापासून नवीन प्रवेश सुरू केले. यंदा शिशुवर्गापासून चौथीपर्यंतच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून देणगी स्वरूपात कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. उलट ८ एप्रिलपर्यंत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
मो. ह. विद्यालयातील विद्यार्थीसंख्या गेल्या काही वर्षांत ४० टक्क्यांनी घटली आहे. शाळा व्यवस्थापनाने त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे पूर्वी जिथे एका इयत्तेचे सहा वर्ग भरत. तिथे आता अवघे चार वर्ग सुरू आहेत. पटसंख्या आणखी घसरू नये म्हणून यंदा शाळा व्यवस्थापनाने विशेष योजना जाहीर केल्या आहेत. मुख्याध्यापक, शिक्षकही त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश घेते वेळी अनेक आकर्षक सवलती, भेटवस्तू देण्याबरोबरच शाळेतील पायाभूत सुविधांचे नूतनीकरणही केले जाणार आहे. काळानुरूप आधुनिक शैक्षणिक प्रणालींचा वापरही केला जाणार आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये असतात, तशा सुसज्ज वर्गखोल्या, मुबलक खेळणी, मोकळे वातावरण याचा अवलंब करण्यात येईल, अशी माहिती मो. ह. व्यवस्थापनाने दिली. शाळेच्या या नव्या योजनांच्या जाहिराती शाळेने शहरात ठिकठिकाणी लावल्या आहेत. त्यासाठी शिक्षक घरोघरी फिरत आहेत. शाळेने मराठी-इंग्रजी मिश्र माध्यमाचे वर्ग सुरू केल्याची माहिती पालकांना दिली जात आहे.
मराठी शाळा दर्जाच्या बाबतीत कुठेही कमी पडत नाहीत. मो. ह. शाळेला तर गुणवंत विद्यार्थ्यांची मोठी परंपरा आहे. अधिकाधिक ठाणेकरांनी आपल्या पाल्यांसाठी या शाळेचा पर्याय स्वीकारावा म्हणून आम्ही यंदा विशेष प्रयत्न करीत आहोत.
– सुनील पाटील, मुख्याध्यापक, मो. ह. विद्यालय (पूर्व प्राथमिक व प्राथमिक)