डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील नेहरू रस्त्यावर पडिक छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईच्या बाजुला असलेल्या उद्यानात मागील काही महिन्यांपासून बंद असलेला मटक्याचा अड्डा पुन्हा सुरू झाला आहे. सकाळपासून ते संध्याकाळी उशिरार्यंत हा अड्डा सुरू असतो. हा अड्डा सुरू झाल्यापासून या रस्त्यावरून जाणारे पादचारी, परिसरातील रहिवासी मटका अड्ड्यावरील ग्राहकांच्या वर्दळीने त्रस्त आहेत.

अनेक ग्राहक या मटका अड्ड्यावर मद्य पिऊन येतात. या मटका अड्ड्यावर त्यांचे आर्थिक नुकसान झाले की ते याठिकाणी मोठ्या आवाजात ओरडून गोंधळ घालतात. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्याचा त्रास होतो. मागील अनेक वर्षापासून हा मटका अड्डा नेहरू रस्त्यावरील उद्यानाच्या कोपऱ्यावर मोकळ्या जागेत चालविला जातो. डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली भागातील एका झोपडपट्टीतील महिला हा अड्डा चालवते. त्यांना एका मटका चालकाचा आशीर्वाद असल्याचे समजते.

काही महिन्यापूर्वी रामनगर पोलिसांनी या मटक्यावर छापा मारून हा अड्डा बंद पाडला होता. या अड्डा चालकांवर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल असुनही अड्डा चालक महिलेने पुन्हा नेहरू रस्त्यावर सकाळपासून मटका अड्डा सुरू केला आहे. पत्त्याचा तीन पानी खेळही याठिकाणी खेळला जात असल्याची माहिती आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी शहरातील गांजा तस्करांचे अड्डे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, टवाळकी करणाऱ्या टवाळखोरांविरुध्द जोरदार कारवाईची मोहीम उघडली आहे. अशा परिस्थितीत आपल्या पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर मटक्याचा अड्डा सुरू हे रामनगर पोलिसांना दिसत कसे नाही, असे प्रश्न नेहरू रस्ता भागातील रहिवासी आणि या रस्त्याने जाणारे प्रवासी उपस्थित करत आहेत.

नेहरू रस्त्यावर कामगारांचा नाका आहे. दोन हजाराहून अधिक कामगार याठिकाणी मजुरीसाठी येतात. या भागात रिक्षा वाहनतळ आहेत. इतर व्यवसायातील नागरिक, व्यसनी या मटक्या अड्ड्यावर झटपट पैसा मिळेल या अपेक्षेने कामधंदा सोडून या अड्ड्यावर येऊन खेळत बसतात. यामध्ये कधी त्यांना आर्थिक लाभ तर कधी तोटा होतो. आपल्या पतीच्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या, त्याच्याकडून मिळणाऱ्या रोजंदारीवर घर चालणाऱ्या काही महिला आपला पती या मटका अड्ड्यावर खेळत नाही ना याची पाहणी करण्यासाठी फेऱ्या मारत असतात, असेही या भागातील काही व्यावसायिकांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मटका अड्ड्यांवरील खेळांमुळे अनेक कुटुंब उध्दवस्त होत आहेत. याची जाणीव ठेऊन पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी आपल्या नियंत्रणाखालील विशेष पोलीस पथक पाठवून नेहरू रस्त्यावरील मटका अड्डा उध्वस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.