ठाणे : ठाणे शहरातील विशेषत: घोडबंदर पट्ट्यात मोठ्याप्रमाणात पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. या समस्येविषयी सोमवारी मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि आमदार संजय केळकर यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत ठाणे शहराला मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या नियोजित ५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पुरवठ्यापैकी २५ एमएलडी पाणी पुरवठा करण्याबाबत हालचाल सुरू झाली आहे. त्यामुळे ठाणे शहरातील पाणी प्रश्नावरून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीत डासांच्या वाढत्या उपद्रवाने नागरिक हैराण; पालिकेकडून धूर फवारणी होत नसल्याच्या तक्रारी

ठाणे महापालिका क्षेत्रात चार जलस्त्रोतांमार्फत दररोज ५८५ एमएलडी पाणी पुरवठा होतो. यामध्ये एमआयडीसी, स्टेम प्राधिकरण, मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिकेची स्वत:ची योजना या चार स्त्रोतांचा सामावेश आहे. गेल्याकाही वर्षांमध्ये ठाणे शहरात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. घोडबंदर पट्ट्यात ३० ते ४० मजल्यांच्या इमारती उभ्या राहत आहेत. या भागात मोठ्याप्रमाणात पाणी समस्या आहे. घोडबंदरसह बाळकुम, कोलशेत, ढोकाळी भागातही इमारतींचे बांधकाम सुरू आहेत. त्यामुळे पाणी समस्या आणखी भेडसावण्याची शक्यता आहे. या समस्येविषयी आमदार संजय केळकर यांनी सोमवारी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचीही भेट घेतली. त्यानंतर मुंबई आणि ठाणे महापालिकेतील पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीत बेदरकारपणे मोटार, दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई; नाकाबंदीसाठी ६१७ पोलीस तैनात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे शहराला मुंबईकडून मिळणाऱ्या नियोजित ५० एमएलडी पाणी पुरवठ्यापैकी २५ एमएलडी पाणी तातडीने मिळावे याबाबत संजय केळकर यांनी आग्रह धरला. त्यावर अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेला अतिरिक्त पाणी देता येईल असे सांगितले. तसेच याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी ठाणे महापालिकेला कशा पद्धतीने अतिरिक्त पाणीपुरवठा करायचा याविषयावर देखील चर्चा झाली. मुंबई महापालिकेचे वरळी येथे पाणी पुरवठा विभागाचे नियोजन केंद्र असून तेथील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी यापूर्वी ठाणे महापलिकेचे आयुक्त म्हणून काम केले आहे. त्यांना ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्याची माहित आहे. अतिरिक्त पाणी पुरवठ्याबाबत त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. – संजय केळकर, आमदार.