ठाणे : ठाणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या चाचणीसाठी मेट्रोची ट्रेन दाखल झाली आहे. सोमवारी मेट्रोचे दोन कोच चढविण्याचे काम झाले. १० रेल्वे स्थानकांमध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात ही चाचणी केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. मेट्रो मार्गिका सुरु झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई, घोडबंदरकडे होणारा प्रवास सुकर होणार आहे. रोजच्या कोंडीतून मुक्ती मिळणार असल्याने, प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल, असे सांगितले जात आहे.
घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. घोडबंदर येथील कासारवडवली ते वडळा (मेट्रो चार) आणि कासारवडवली ते गायमुख (मेट्रो चार अ) अशी ही मार्गिका असून मागील अनेक वर्षांपासून मेट्रो मार्गिका निर्माणाचे काम घोडबंदरमध्ये सुरु आहे. भर रस्त्यात ही कामे सुरु असल्याने ठाणेकरांना कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर महिन्यात मेट्रोची चाचणी होणार असल्याचा दावा केला होता. त्यानुसार सोमवारी मेट्रो मार्गिकेवर दोन कोच चढविण्याचे काम सुरु होते. मेट्रो दाखल होताच, ही मेट्रो पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. सोमवारी सकाळीच जेव्हा मेट्रोचा कोच मोठ्या ट्रेलरवरून आणला गेला, तेव्हा परिसरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. कामगारांसोबतच स्थानिक नागरिक, प्रवासी, दुकानदार हे पाण्यासाठी थांबले होते. मेट्रोचा कोच पाहताच अनेकांनी मोबाईलमध्ये फोटो, व्हिडिओ टिपले.
ठाणेकरांना दिलासा
– मेट्रो मार्गिका सुरु झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई, नवी मुंबई, वडाळा, भांडुप, घोडबंदरकडे होणारा प्रवास सुकर होणार आहे. रोजच्या कोंडीतून मुक्ती मिळणार असल्याने, प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल, असे सांगितले जात आहे.
चाचणी केव्हा आणि कशी
– मेट्रो मार्गिकेसाठी कॅडबरी जंक्शन ते गायमुख अशा १० किलोमीटर अंतरावर ही चाचणी होणार आहे. चाचणीची तारिख ठरली नसली तर सप्टेंबर महिन्यात केव्हाही ही चाचणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही चाचणी पाहण्यासाठी आता ठाणेकर आतुर झाले आहेत.