ठाणे : ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या दर्जा सुधारणांबाबत आणि वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना काही योजना आखल्या होत्या. त्यांची अंलबजावणी करण्यात येईल. तसेच जिल्हा वाहतूक कोंडीमुक्त आणि खड्डेमुक्त करण्याच्या मुद्दय़ावर भर दिला जाईल, अशी ग्वाही ठाणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

 देसाई यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. देसाई यांनी अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील रखडलेल्या कामांची यादी पाठवण्याच्या सूचना केल्या. या कामांबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यावरील स्थगिती उठवण्याबाबत चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबबरोबर  ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम दोन टप्प्यांत करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली.

नियोजन समितीच्या बैठकीआधी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची एक बैठक आयोजित केली होती. यामध्ये उपस्थित लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांना त्यांच्या विभागातील समस्यांची माहिती दिली. दरम्यान,  या पहिल्याच बैठकीला मंत्री चार तास उशिराने पोहोचले. 

अधिकाऱ्यांची कानउघाडणी ..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे जिल्ह्यातील विकासकामांसाठी दिलेला जिल्हा वार्षिक योजनांचा निधी वेळेत आणि १०० टक्के खर्च होईल याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी. त्यात कुठलीही दिरंगाई करू नये. तसेच अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून काम न करता प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन काम करावे, अशी सक्त ताकीद देत शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.