इस्त्रीसाठी कपडे न्यायला आलेल्या चौदा वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना मीरा रोड येथील इंद्रलोक परिसरात घडली आहे. पोलिसांनी आरोपीला बेडय़ा ठोकल्या आहेत.
पीडित मुलीच्या वडिलांचे इंद्रलोक परिसरात कपडय़ांना इस्त्री करण्याचे दुकान आहे. रहिवाशांचे कपडे आणण्याचे काम पीडित मुलगीच करायची. आरोपी दिनेश चौधरी याच परिसरात आपल्या बहिणीकडे राहतो. बुधवारी रात्री आठच्या सुमारास ही मुलगी आपल्या भावासोबत आरोपी राहत असलेल्या इमारतीत कपडे आणण्यासाठी गेली होती. आरोपी दिनेश चौधरी याच्याकडे तिने कपडय़ांविषयी चौकशी केली असता त्याने सुरुवातीला कपडे नाहीत म्हणून सांगितले. त्यामुळे पीडित मुलगी दुसऱ्या घरी गेली. तिथले कपडे घेऊन ती परतत असताना आरोपीनी तिला थांबवले आणि कपडे घेऊन जायला सांगितले. मुलीने जवळचे कपडे भावाकडे देऊन ती स्वत: दिनेश चौधरीच्या घरी कपडे आणायला गेली. आरोपीने तिला घरात बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला.
ही घटना पीडित मुलीने घरी आल्यावर पालकांना सांगितली. पालकांनी लगेचच इमारतीत जाऊन तेथील रहिवाशांना याबाबत सांगितले. त्यांनी दिनेशला धरून ठेवले आणि पोलिसांना पाचारण केले. परंतु पोलीस येण्याआधीच गोंधळाचा फायदा घेत दिनेश तेथून पळून गेला. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी दिनेश काम करत असलेल्या दुकानाच्या मालकाशी संपर्क केला. त्याच्या दुकानात आणखी काही कर्मचारीही काम करत होते. हे कर्मचारी राहत असलेल्या ठिकाणी पोलिसांना छापा टाकला असता दिनेश त्या ठिकाणी लपून बसल्याचे आढळून आले. त्याला तात्काळ अटक करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 29th Apr 2016 रोजी प्रकाशित
मीरा रोड येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार
चौदा वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना मीरा रोड येथील इंद्रलोक परिसरात घडली आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 29-04-2016 at 03:03 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor girl rape in mira road