ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा म्हणून कळवा पोलिसांनी काही तरुणांवर गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या कारभारावर टीका केली आहे. पोलिसांच्या या अतिरेकी कारवाईस प्रत्युत्तर देणार, असा इशाराही त्यांनी दिला. तर, पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले असून, विनापरवाना मिरवणूक आणि मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने १९ फेब्रुवारीला भीमनगर येथे राहणारे तुळशीराम साळवे, भीमा साळवे यांच्यासह काही जणांनी कळवा नाका येथे दुचाकी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर तुळशीराम, भीमा यांच्यासह इतर जणांविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी दाखल केलेल्या या गुन्ह्याची कागदपत्रे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा – ठाणे : उर्जादायी असलेल्या तृणधान्याचे आहारात प्रमाण वाढवा, डॉ. उदय आणि डॉ. मधुरा कुलकर्णी यांचे प्रतिपादन

हेही वाचा – मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा शिवरायांच्या जयंतीलाच देणे, हा जर गुन्हा असेल तर मी पण असा गुन्हा करणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा मनामनात आणि मुखामुखात आहे. पोलीस जर अशी अतिरेकी कारवाई करणार असेल आणि शिवरायांवरील प्रेमापासून रोखणार असेल तर ते चालणार नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आम्ही या अतिरेकी कारवाईस प्रत्युत्तर देणार, असे आमदार आव्हाड यांनी म्हटले आहे. आव्हाड यांनी केलेल्या ट्वीटनंतर पोलिसांवर चौफेर टिका होऊ लागली आहे. दरम्यान, कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.पी. थोरात यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. विनापरवाना मिरवणूक आणि मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.