बदलापूरः येत्या काळात होऊ घातलेल्या कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या प्रभाग रचनेत मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. या संदर्भातील तक्रार पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त यांना दिली असून, सध्याची प्रभाग रचना तात्काळ रद्द करून आपल्या देखरेखीखाली नवी रचना करण्यात यावी अशी मागणी आमदार कथोरे यांनी केली आहे.
आमदार कथोरे यांनी पत्रात नमूद केले आहे की, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड, जे सध्या प्रशासक पदावरही कार्यरत आहेत, यांनी काही इच्छुक उमेदवार, ठरावीक पक्षाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांच्या फायद्यासाठी प्रभाग रचना केली आहे. यासाठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कथोरे यांच्या मते, नदी, नाले, राज्य महामार्ग, रेल्वे आदी बाबत स्पष्ट नियमावली अस्तित्वात असतानाही ती धाब्यावर बसवून लाखो रुपयांच्या बदल्यात प्रभाग रचना करण्यात आली.
या कथित गैरव्यवहारात १५-१६ प्रभागांमध्ये नियम तोडले गेल्याचे कथोरे यांनी पत्रात सांगितले. तसेच, अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असणाऱ्या प्रभागांचे आराखडे ठरावीक उमेदवारांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आले. या प्रक्रियेत अभियंता एका अभियंत्याच्या माध्यमातून लाखो रुपयांची वसुली झाल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. आमदार कथोरे यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, विद्यमान प्रभाग रचना रद्द करून कायदेशीर नियम आणि निकष पाळत, आपल्या नियंत्रणाखाली नव्याने प्रभागरचना करण्याची आवश्यकता असल्याचे पत्रात म्हणाले.
प्रतिक्रिया: शासन आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार प्रभार रचनेचे सुरू असते. आताची रचनाही अशा मार्गदर्शनानुसारच करण्यात आली आहे. त्यामुळे आक्षेपचा प्रश्न नाही. – मारूती गायकवाड, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका.
राजकीय संघर्षाची किनार
बदलापूर शहरात गेल्या काही महिन्यात शिवसेना आणि भाजपातील संघर्ष वाढला आहे. भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यात शितयुद्ध सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत संघर्ष टोकाला गेला होता. या काळात विरोधकांना धमकावण्यासाठी गुंडांची मदत घेतल्याचाही आरोप झाला. स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप आमदार किसन कथोरे यांना विरोध केला असला तरी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेवटच्या क्षणाला किसन कथोरे यांच्याासाठी सभा घेताना दिसले. त्यावेळी त्यांनी संघर्ष संपवण्याचे आवाहन केले होते. मात्र हा संघर्ष निकालानंतर आणखी वाढला. निकालानंतरच्या पहिल्याच विजयी सभेत कथोरे यांनी विरोधकांना इशारा दिला होता. त्यानंतर एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे प्रकार सुरूच राहिले. पालिका निवडणुकीत हा महायुतीतील घटकपक्षांचा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. प्रभार रचनेच्या निमित्ताने हे अधोरिखत होते आहे.
बदलापुरातील पक्षीय बलाबल
दरम्यान, २०२५ मधील निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. एकूण ४७ जागा असलेल्या कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत, २०१५ च्या निवडणुकीत शिवसेनेने २५ जागा, भाजपने २० जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसने २ जागा जिंकल्या होत्या. सध्याची वॉर्डरचना रद्द करण्याची मागणी मान्य झाल्यास निवडणूक प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घडामोडींमुळे येत्या निवडणुकीपूर्वी नगरपालिकेच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.