ठाणेः शिळफाटा – कल्याण – रंजनोली असा अशक्यप्राय वाटणारा आणि तितकाच कोंडीयुक्त प्रवास लवकरच गतीमान होणार आहे. या २१ किलोमीटरच्या वाहतुकीचे परिमाण बदलणारा उड्डाणपूल लवकरच उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कोंडीने त्रस्त असलेल्या या मार्गावर आता दिलासा मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) तर्फे या भव्य उड्डाणपुलाच्या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) पुनरावलोकन तसेच तो अंतिम करण्यासाठी अनुभवी सल्लागार संस्था नियुक्त करण्याची निविदा काढण्यात जाहीर केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरे आणि महत्वाचे रस्ते कोंडीत अडकले आहेत. कल्याण शिळफाटा रस्त्यावर शिळफाटा, पलावा, डोंबिवली, कल्याण ही कोंडीची ठिकाणे आहेत. याच रस्त्यावरून काटईवरून अंबरनाथकडे जाणाऱ्या मार्गावर कोळेगाव, खोणी, नेवाळी आणि अंबरनाथ शहराच्या वेशीव कोंडी होते. शिळफाटा, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर वाहने भिवंडी, राजनोलीकडे प्रवास करतात. असाच प्रवास भिवंडी, राजनोलीहून डोंबिवली, शीळफाटा, नवी मुंबईच्या दिशेला करतात. या प्रवासासाठी कोंडीत नसताना दीड तर कोंडी असताना दोन ते अडीच तास लागतात. हा प्रवास अवजड वाहने मुंब्रामार्गे नाशिक महामार्गाने करतात. हा प्रवास करण्यासाठी सध्याच्या घडीला थेट मार्ग नाही. विविध शहरे ओलांडूनच हा प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ, इंधन आणि श्रम मोठ्या प्रमाणावर खर्च होतात.
त्यामुळे या भागात थेट उड्डाणपूल असावा अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएकडे केली होती. त्यानंतर एमएमआरडीएने यावर प्रक्रिया सुरू केली. आता एमएमआरडीएने यासाठी निविदा जाहीर केली असून या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल पुनरावलोकन तसेच तो अंतिम करण्यासाठी अनुभवी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यासाठी पाऊल उचलली आहेत.
औद्योगिक शहरांसाठी जीवनरेखा
भिवंडी हा देशातील एक मोठा गोदाम व मालवाहतूक केंद्र आहे. दररोज हजारो ट्रक, कंटेनर व व्यावसायिक वाहने या मार्गाने जातात. उड्डाणपुलाच्या बांधकामानंतर वाहतुकीचा वेग वाढेल, इंधनाचा वापर कमी होईल आणि औद्योगिक व्यवहार अधिक गतिमान होतील. तर प्रवासी वाहतुकीसाठीही हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे. जवळपास दोन दशकांपासून या मार्गाच्या विस्तार व सुधारण्याची मागणी होत आहेत. यापूर्वी या मार्गाचे सहापदरीकरण पूर्ण करण्यात आले. मात्र वाहनांची वाढती संख्या पाहता ते अपुरे पडत आहेत.
प्रत्येक चौक कोंडीचा
राजनोली ते शिळफाटा या २१ किलोमीटरच्या मार्गात प्रत्येक चौकात कोंडी होते आहे. या कोंडीमुळे येथून विनाथांबा प्रवास करता येणे शक्य होत नाही. राजनोलीपासून गोवे, कोनगाव, दुर्गाडी, पत्रीपूल, नेतवली, टाटापावर, दावडीफाटा, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, घारिवली,, काटई, पलावा, देसाई, खिडकाळी, डायघर अशा सर्वच चौकात मोठी कोंडी होते. त्यामुळे आता निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.