डोंबिवली – गेल्या दोन वर्षापासून टिळक रस्त्यापेक्षा खड्यातला रस्ता म्हणून ओळख असणाऱ्या डोंबिवली पूर्वेतील लोकमान्य टिळक रस्त्याचे सीमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या रस्ते कामातील सर्वेश सभागृह ते फडके रस्त्यावरील मदन ठाकरे चौक या पहिल्या टप्प्याचा कामाला रविवारी प्रारंभ करण्यात आला.

हे रस्ते काम सुरू असले तरी हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद न ठेवण्याचा निर्णय डोंबिवली वाहतूक विभागाने घेतला आहे. या रस्ते मार्गाची सर्वेश सभागृहाकडून मदन ठाकरे चौक फडके रस्त्याकडे जाणारी मार्गिका सुरू राहणार आहे.

दिवाळी सणापूर्वी गेल्या आठवड्यात लोकमान्य टिळक पुतळा, कारवा रूग्णालय, सर्वेश सभागृह, ब्राह्मण सभा ते फडके रस्त्यावरील मदन ठाकरे चौक रस्त्याचे सीमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात येणार होते. परंतु, दिवाळी सणाच्या काळात हा रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी खोदला तर अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा फटका शहरवासियांना बसेल म्हणून ठेकेदार, वाहतूक विभाग आणि काही लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाने हे कामे दिवाळी सणानंतर करण्याचे निश्चित केले होते.

रविवारी सकाळी फडके रस्त्यावरील मदन ठाकरे चौकापासून रस्त्याची डावी मार्गिका खोदण्यास सुरूवात करण्यात आली आहे. ही मार्गिका सर्वेश सभागृहापर्यंंत खोदण्यात येणार आहे. या डाव्या एका मार्गिकेचे सीमेंट काँक्रीटचे काम सुरू असताना टिळक पुतळ्याकडून सर्वेश सभागृहाकडून मदन ठाकरे चौकाकडे येणारी एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली राहणार आहे. या एक मार्गिकेमुळे इतर रस्त्यांवर येणारा वाहनांचा भार कमी होणार आहे, असे डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी सांगितले.

सर्वेश सभागृह ते मदन ठाकरे चौकाचे डावे मार्गिकेचे सीमेंट काँक्रीटचे काम पूर्ण झाल्यावर उजव्या मार्गिकेचे काम ठेकेदाराकडून हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर डावी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. हा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर सर्वेश सभागृह ते लोकमान्य टिळक पुतळा ही डाव्या, उजव्या मार्गिकेची कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही कामे करताना डोंबिवली शहरात वाहतूक कोंडी होणार नाही असे नियोजन करून ही रस्ते कामे पूर्ण केली जाणार आहेत.

सर्वेश सभागृह ते मदन ठाकरे चौक दरम्यानची डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहतूक सुरू राहणार आहे. रेल्वे स्थानकाकडून टिळक पुतळ्याकडे जाणारी वाहने डावी मार्गिका पूर्ण होईपर्यंत पी. पी. चेंबर्स, भगतसिंह रस्ता, कारवा रूग्णालय ते टिळक चौक, फडके रस्ता, सावरकर रस्ता, नेहरू रस्ता, चार रस्त्याने टिळक पुतळ्याकडून इच्छित ठिकाणी धावतील.

गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत टिळक रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या रस्त्यावर उडणाऱ्या धुळीने परिसरातील रहिवासी, व्यापारी त्रस्त आहेत. डोंबिवली शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असल्याने या रस्त्याचे काम एमएमआरडीएने लवकर पूर्ण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.