ठाणे महापालिकेच्या लेखा परिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत खासगी रुग्णालयांनी करोना उपचारानंतर रुग्णांकडून १ कोटी ८९ लाख ८२ हजार रुपयांची अवाजवी देयके वसुल केल्याचे उघड झाले होते. यानंतर पालिकेच्या आदेशाने खासगी रुग्णालयांनी १ कोटी ३४ लाख ८३ हजार रूपयांचा रुग्णांना परतावा केला असला तरी अजूनही ५४ लाख ९९ हजार रुपयांचा परतावा शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- डोंबिवलीत उद्यापासून राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन, रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

दोन वर्षाचा काळ लोटूनही रुग्णांना त्याचे पैसे मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून मनसेने पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर रुग्णांना पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांना अभय दिले असल्याचा आरोपही मनसेने केला आहे. दरम्यान, त्या रुग्णालयांना नोटीसा बजावल्या असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने दिले आहे.

करोना काळात रुग्ण संख्येत मोठी वाढ होऊ लागल्याने त्यांच्या उपचारासाठी रुग्णालये अपुरी पडू लागली होती. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने खासगी रुग्णालयांना करोना रुग्णालये म्हणून जाहिर केले होते. परंतु यापैकी काही रुग्णालयांनी उपचारानंतर रुग्णांकडून अवाजवी देयके वसुल केली होती. याबाबत तक्रारीही पुढे येत असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी याबाबत आवाज उठविला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिका प्रशासनाने करोना रुग्णांचे देयक योग्य पध्दतीने तपासण्यासाठी लेखापरिक्षकांची नेमणूक केली होती. यामध्ये रुग्णांकडून १ कोटी ८९ लाख ८२ हजार रुपयांची अवाजवी देयके वसुल करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. मात्र तेव्हा ही वाढीव बिले कमी करण्यास रुग्णालयांनी नकार दिला होता. तर काही रुग्णालयांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. त्यावेळेस संदीप पाचंगे यांनी वाढीव बिलाचा परतावा रुग्णांना होत नाही तोपर्यंत रुग्णालयांचे नूतनीकरण करू नका अशी मागणी पालिकेकडे केली होती. परिणामी अनेक रुग्णालयांनी वाढीव बिलांचा परतावा केला. मात्र काही मुजोर रुग्णालयांचे प्रशासन वाढीव बिलांचा परतावा करण्यास तयार नाहीत. १ कोटी ३४ लाख ८३ हजार रूपयांचा रुग्णांना परतावा करण्यात आला असला तरी अजूनही ५४ लाख ९९ हजार रुपयांचा परतावा शिल्लक असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा- डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद

गांधीनगर येथील वेल्लम रुग्णालयाने ५ लाख ५० हजार ६५० रुपयांचा धनादेश रुग्णाचा परतावा म्हणून आरोग्य विभागाकडे दिला आहे. अद्याप ही रक्कम रुग्णांना परत केली गेली नाही. आरोग्य विभागाकडून कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. जास्त देयकाच्या आकारणी संदर्भात पालिकेचे मुख्य लेखा परीक्षक संजय पतंगे यांनी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी पालिकेच्या आरोग्य विभागाला पत्र लिहिले असून त्यात हायलँड हॉस्पिटल ११ लाख ५४ हजार ८२०, युनिव्हर्सल हॉस्पिटल १० लाख १० हजार ५४६ आणि निऑन हॉस्पिटल १५ लाख ५० हजार ८४८ हजार रुपयांचा परतावा शिल्लक आहे. या रुग्णालयांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आपल्या स्तरावर कारवाई करून वसुली करण्यात यावी अशी सूचना केली आहे. मात्र आरोग्य विभागाकडून अद्याप कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप पाचंगे यांनी केला आहे.

हेही वाचा- कल्याणमध्ये आजपासून आगरी-कोळी, मालवणी महोत्सव

संबंधित रुग्णालयांना आरोग्य विभागाने नोटीसा बजावल्या असून त्यात त्यांना याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितलेले आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. योगेश शर्मा यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns accuses thane municipal health department of giving shelter to hospitals paying exorbitant fees during corona dpj
First published on: 12-01-2023 at 17:52 IST