ठाणेः कल्याण-डोंबिवली शहरात गेल्या तीन दिवसांत तब्बल पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याने शहरातील आरोग्यव्यवस्था आणि प्रशासनाविषयी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दोन नागरिकांना जीव गमवावा लागला, सर्पदंशामुळे आणखी दोन नागरिकांचा मृत्यू झाला, तर एका चिमुकल्याचा चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला. या घटनांनंतर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी विविध समस्यांवरून स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. सुरूवातील पलावा भागातील वाहतूक कोंडीवरून पाटील यांनी शिवसेनेचे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले होते. पलावा पुलाच्या उद्घाटनानंतर काही तासातच तो बंद करावा लागला. त्यानंतर पडलेले खड्डे आणि त्यावरून पुन्हा टीकेच झोड उठवली गेली. याच काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टर दौऱ्यावरही टीका झाली.

दोनच दिवसांपूर्वी राजू पाटील यांनी पुण्यातील खासदार मेधा कुलकर्णी यांनी रोखलेल्या गरबा कार्यक्रमाचा संदर्भ देत डोंबिवली शहरात आय़ोजीत केल्या जाणाऱ्या गरब्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर आता राजू पाटील यांनी पुन्हा एकदा सामाजिक समस्येवरून टीका केली आहे. पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयावर थेट बोट ठेवले आहे. स्मार्ट सिटी म्हणून मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या, पण टक्केवारीच्या खेळामुळे भिकेला लावलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत योग्य उपचाराची, तसेच मूलभूत आरोग्य सुविधा नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे. “केडीएमसी रुग्णालयात योग्य उपचाराची सोयच नाही. त्यामुळेच नागरिकांना आपल्या प्राणांची किंमत चुकवावी लागत आहे,” अशी थेट टीका त्यांनी केली.

सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“जनता मृत्यूशी झुंज देत आहे, पण सत्ताधारी मात्र उत्सव, राजकारण आणि जाहिरातींमध्ये मश्गुल आहेत. जर खरंच नागरिकांच्या जिवाची किंमत कळत असेल तर जबाबदारी स्वीकारून तात्काळ ठोस निर्णय घ्यावेत,” अशी मागणी पाटील यांनी केली आहे. अन्यथा लोकशाहीच्या उत्सवात हीच जनता तुमचा बाजार उठवेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

नागरिकांमध्ये संताप

दरम्यान, शहरात अवघ्या काही दिवसांत इतक्या मृत्यूच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात, सर्पदंशासारख्या घटना, तसेच सुरक्षिततेच्या अभावामुळे लहान मुलांचे जीव जाणे—या सर्वच बाबींवरून पालिका प्रशासनाची बेफिकिरी चव्हाट्यावर आली आहे.