ठाण्यात मनसे नेत्याची भररस्त्यात हत्या करण्यात आली आहे. राबोडी परिसरात मनसे पदाधिकारी जमील शेख दुचाकीवर जात असताना त्यांच्या डोक्यावर गोळी झाडण्यात आली. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी जमील शेख यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरुन फरार झाले. जखमी अवस्थेत जमील शेख यांनी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

जमील शेख यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आला आहे. तर अज्ञात आरोपींचा शोध सुरु आहे. पोलीस सध्या आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात होत असलेल्या नव्या प्रकल्पावरुन वाद सुरु होता. यादृष्टीने पोलीस तपास सुरु आहे.

दरम्यान घटनेचं सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलं असून जमील शेख दुचाकीवरुन जाताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या मागे एक दुचाकी असून दोघेजणे त्यावर बसलेले दिसत आहेत. यावेळी दुचाकीवर मागे बसलेली व्यक्ती जमील यांच्यावर गोळी झाडत असल्याचं दिसत आहे. पहिल्यांदा गोळी झाडल्यानंतर नेम चुकल्याने मारेकरी जवळ जाऊन डोक्यावर गोळी झाडताना स्पष्ट दिसत आहे. यानंतर जमील दुचाकीसह जमिनीवर कोसळत असून आरोपी पळ काढताना दिसत आहेत.

जमिल यांच्या हत्येची माहिती मिळताच परिसरात मोठ्या प्रमाणात मनसैनिक जमा झाले होते. यामुळे परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. “या हल्ल्यामागचे कारण हे क्लस्टर योजना आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीचा शोध लावावा, मनसेला कायदा हातात घेण्यास भाग पाडू नये,” असा इशारा मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला आहे.