कल्याण: आता महापालिका निवडणुका तोंडावर आल्यामुळे कल्याण डोंबिवलीत नव्या जुन्या विकास कामांचा धडाका आणि धुरळा उडविला जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी कल्याण, डोंबिवलीत येऊन विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण केले. हे करत असताना उपमुख्यमंत्र्यांनी आठ वर्षापूर्वी भूमिपूजन केलेल्या पलावा पूल, नऊ वर्षापूर्वी सुरू कलेल्या अमृत योजना प्रकल्प, कल्याण पूर्वेतील लोकग्राम, दिवा पादचारी पुलाची कामे कधी पूर्ण होतील आणि त्यांचे लोकार्पण कधी होईल, तेही जाहीर करून टाकावे, अशी बोचरी टीका मनसेचे नेते राजू पाटील यांंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर समाज माध्यमातून (एक्स) केली आहे.
कल्याण डोंबिवलीत येऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन केले याबद्दल जनतेत समाधान आहेच, पण त्याच बरोबर लोकांच्या अतिशय जिव्हाळ्याचे, लोक प्रतिक्षेत असलेले पलावा येथील उड्डाण पूल, कल्याण पूर्वेतील रेल्वे मार्गालगतचा लोकग्राम पादचारी पूल, दिवा येथील पादचारी पूल, २७ गावांना मुबलक पाणी पुरवठा करणारी अमृत योजना, डोंबिवलीतील ब्राह्मण सभेसमोरील सुतिकागृहाचे भूमिपूजन होऊन दीड वर्ष झाले. हे प्रकल्प कधी पूर्ण होतील आणि त्यांचे कधी लोकार्पण होईल हे एकदा उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर करून टाकावे, अशी मागणी समाज माध्यमातून पाटील यांनी केली आहे.
आता महापालिका निवडणुका तोंडावर आल्यामुळे भूमिपूजन, लोकार्पण सोहळ्यांचा धुरळा आणि धडका उठविला जाईल. या धुरळ्यामध्ये लोक प्रतिक्षेत असलेले पलावा, दिवा, लोकग्राम पुलांची कामे लवकर पूर्ण होतील याकडे उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्याने एका गरीब रुग्ण महिलेचा मृत्यू झाला. ही पालिका प्रशासन, या शहराचे पालकत्व असलेल्या नेत्यांसाठी शरमेची बाब आहे. भूमिपूजन होऊन दीड वर्ष होऊन गेले तरी डोंबिवलीत ब्राह्मण सभेसमोरील सुतिकागृहाचे काम अद्याप सुरू नाही. पालिका रुग्णालयात गर्भवती महिलांना योग्य रुग्णसेवा मिळत नसल्याने महिलांना खासगी किंवा ठाणे, मुंबईत पाठविले जाते. याला जबाबदार कोण, असा प्रश्न राजू पाटील यांनी केला आहे.
नवा कोरा शिळफाटा काँक्रीट रस्ता मेट्रो कामासाठी खोदून ठेवला आणि प्रवाशांना वाहन कोंडीच्या जाळ्यात अडकविण्याचे पाप कोणी केले आहे. हे पाप पुसून टाकण्यासाठी शिळफाटा रस्ते बाधितांना वेळेवर त्यांना हक्काचा मोबदला दिला तर शिळफाटा रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण आणि काँक्रीटकरणाचे काम पूर्ण होईल. या सर्व कामांचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी हे रखडलेले प्रकल्प लवकर पूर्ण होऊन लोकांच्या सेवेत येतील यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे.
कल्याण ग्रामीण भागातील जे विकास प्रकल्प मार्गी लागावेत म्हणून राजू पाटील अनेक वर्ष प्रयत्नशील आहेत. त्याच प्रकल्पांना राजकीय सूडबुध्दीतून खिळ मारण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील विकास कामांच्या प्रत्येक मुद्द्यावर पाटील शिंदे पिता पुत्रांना लक्ष्य करत आहेत.