कल्याण – कल्याणमध्ये रविवारी भाजप पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली शहरांचे विकासाला लागलेले ग्रहण सोडवायचे असेल तर कल्याण डोंबिवली पालिकेवर भाजपचा महापौर बसवा आणि कल्याण परिसर भाजपमय करा, असे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले. हाच शब्द धागा पकडून मनसेचे नेते राजू पाटील यांनी आपण पालिकेत ३० वर्ष शिवसेनेच्या सत्तेबरोबर सहभागी आहात. त्यामुळे शिवसेनेच्या पापात सहभागी व्हायचे नसेल तर आपण विकासाला ग्रहण लावणाऱ्या चाँदभाईचे नाव घेऊन बोला, असे आवाहन केले आहे.

आतापर्यंत कल्याण डोंबिवलीतील नागरी समस्या, विकासाच्या प्रश्नांवर मनसेचे नेते राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांना थेट लक्ष्य केले आहे. आता राजू पाटील यांनी प्रथमच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना रविवारच्या विधानावरून विकासाचे ग्रहण डोंबिवली, कल्याणला कोणी लावले त्या चाँदभाईचे नाव घेण्यासाठी आवाहन केले आहे. पलावा भागातील प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि राजू पाटील हे सख्खे शेजारी आणि दोघांमध्ये समझोता, सामंजस्याचे राजकारण आहे. कल्याण ग्रामीणमध्ये विधानसभा निवडणूक काळात भाजपने मनसेला साथ दिल्याचे आरोप शिंदे शिवसेनेकडून झाले.

पलावा पूल डोंंबाऱ्याचा खेळ

४ जुलै रोजी उद्घाटन झालेला कल्याण शीळ रस्त्यावरील पलावाजवळील काटई निळजे उड्डाण पूल म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ झाला आहे. या पुलाचे उद्घाटन झाल्यापासून पुलावर मोठे चाँद (खड्डे) पडले आहेत. या पुलावरून प्रवास करताना प्रवाशांना कसरत करावी लागते. अतिशय निकृष्ट पध्दतीने या पुलाचे काम करून करदात्या नागरिकांच्या कोट्यवधी रूपयांच्या पैशाची उधळपट्टी करण्यात आली आहे. यामुळे कोणाचे खिसे गरम झाले आहेत. या पुलाच्या गुणवत्तेचा कधी शोध घेणार की नाही.

या पुलाचे अंकेक्षण होणार की नाही. या पुलाच्या गणवत्तेच्या नावाने ढोल पिटले जात आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सर्व प्रश्न तुमच्याकडून उत्तरांच्या अपेक्षेत आहेत. कारण, मागील ३० वर्ष भाजप पालिकेत शिंदे शिवसेने बरोबर सत्तेत होती. त्यामुळे तुम्हाला जबाबदारी झटकता येणार नाही. शिंदे शिवसेनेच्या पापाचे भागीदार व्हायचे नसेल तर यापुढे विकासाला ग्रहण लावणाऱ्या चाँदभाईंची नावे तुम्हाला घ्यावीच लागतील. त्यातून तुमची सुटका नाही, असा खडा सवाल राजू पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना केला आहे.

हा मित्र म्हणून सल्ला आहे, तो पटला तर घ्या अन्यथा, तो पलावा पुलाच्या खड्ड्यात टाकून द्या, असेही पाटील यांनी सूचित केले आहे. पाणी अडवा पलावा पुलावरील खड्ड्यांच्या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवा याच प्रात्यक्षिक सरकारने जनतेला दाखवून दिले. यापूर्वीही शिंदे ॲन्ड सन्स कंपनीने डोंबिवलीकरांच्या भावना, निकृष्ट कामाच्या माध्यमातून खेळ केलाच आहे. त्यामुळे विकासाला ग्रहण लावणाऱ्या या चाँदभाईचे नाव घ्याच आता, असे आवाहन राजू पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना केले आहे.