बदलापूर : एखाद्या राजकीय पक्षाने अधिकृतपणे निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असताना त्या पक्षातील उमेदवार इतर पक्षांमध्ये जाऊन उमेदवारी मिळवतात. मात्र बदलापुरातील मनसेच्या एका महिला उमेदवाराने पक्षाने निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून संधी असतानाही फक्त राज ठाकरेंच्या प्रेमाखातर उमेदवारी नाकारल्याचा प्रसंग समोर आला आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने घडलेल्या या अनोख्या निष्ठेची सध्या शहरात चर्चा रंगली आहे.
मनसेची रणराणिगी म्हणून ओळख असलेल्या संगिता चेंदवणकर या बदलापूर शहरासाठी नव्या नाहीत. शहरातील विविध समस्यांवर थेटपणे आक्रमकरित्या आंदोलन करण्यात त्या कायमच पुढे असतात. बदलापूर शहरात गेल्या वर्षात दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेला त्यांनीच वाचा फोडली. त्यासाठी आंदोलन उभारण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यामुळे हे प्रकरण त्यावेळी दशभर गाजले. रेल्वे रोखली, मुख्यमंत्र्यांना त्याची दखल घ्यावी लागली. त्यामुळे संगिता चेंदवणकर अधिक प्रकाशझोतात आल्या. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांना त्यात अपयश आले.
दरम्यान कुळगाव बदलापूर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्या थेट नगराध्यक्ष पदासाठी आग्रही होत्या. त्यांनी तसा प्रचार सुरू केला होता. त्यांना पाठिंबाही मिळत होता. त्याचवेळी शहरात आठ पक्षांची महाविकास आघाडी जाहीर झाली. मात्र ही आघाडी होण्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषीत करण्यात आला होता. त्यामुळे आघाडीत बिघाडीची शक्यता होती.
मात्र आघाडीतील अनेक पक्ष मनसेच्या चेंदवणकर यांच्यासाठी आग्रही होती. त्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. त्या चर्चेत ठाकरे गटाकडेच नगराध्यक्षपदाची उमेदवारी असेल पण त्यासाठी मनसेच्या संगिता चेंदवणकर या उमेदवार असतील, असे ठरले. त्यासाठी मनसेच्या वरिष्ठांनीही सकारात्मकता दाखवली. त्यामुळे चेंदवणकर महाविकास आघाडीच्या उमेदवार होतील, हे जवळपास निश्चित झाले होते.
मात्र यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वरिष्ठांनी एक अट घातली. ती अट होती पक्ष प्रवेशाची. शिवबंधन बांधून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करावा आणि त्यानंतर पक्षाची उमेदवारी घ्यावी, अशी अट घालण्यात आली होती. याच अटीवर मतभेद झाले. मनसेच्या संगिता चेंदवणकर यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्यास नकार दिला. सोबतच याच अटीवरून त्यांनी उमेदवारीही नाकारली.
उमेदवारीसाठी राजसाहेबांना सोडू शकत नाही
वरिष्ठांनी मशाल चिन्हावर लढायला हरकत नाही, असे सांगितले होते. पण शिवबंधन बांधून पक्षप्रवेश करणे मंजूर नव्हते. वरिष्ठांनी एबी फॉर्म देण्याचे आदेश दिले पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेशाची अट घातली. आम्ही राज ठाकरे यांना सोडू शकत नाही. गेल्या २० वर्षांपासून स्वतः ज्या पक्षासाठी काम करत आहोत तो पक्ष सोडणे नामंजूर होते. त्यामुळे उमेदवारी नाकारली. आणि कार्यकर्ते तसेच मतदारांच्या मागणीनुसार मी अपक्ष म्हणून रिंगणात आहे, असे संगिता चेंदवणकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
यानिमित्ताने पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांनी एकमताने निर्णय घेतला असता तरी स्थानिक पातळीवर पदाधिकाऱच्यांच्या अट्टाहासाने स्थानिक पातळीवर युती होण्यापासून राहिल्याचे चित्र आहे.
