ठाणे : मिरा भाईंदर येथे मराठीच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर आज, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे मिरा भाईंदर शहरात सभा घेण्यासाठी येत आहेत. या सभेपूर्वी मनसेने एक टीजर प्रसिद्ध केला आहे. यामध्ये ‘वाघ येतोय…’ असे म्हटले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे मिरा भाईंदरमध्ये आज होणाऱ्या भाषणात काय मुद्दे मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्रिभाषा सूत्र लागू करणार असल्याचे म्हटले आहे.
गेल्याकाही दिवसांपासून मुंबई आणि ठाण्यात मराठी अमराठी वाद उफाळून येत आहे. नुकतेच मिरा भाईंदरमध्ये मराठी भाषेच्या वादातून एका व्यवसायिकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला होता. या घटनेनंतर तेथील व्यवसायिकांनी मोर्चा काढला होता. त्यामुळे हा वाद आणखी चिघळला होता. त्यातच, एका व्यक्तीने ट्विटरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टॅग करुन मराठी बोलणार नसल्याचे म्हटले. त्यामुळे संताप व्यक्त केला जात होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर म्हणून मराठीच्या मुद्द्यावरून मराठी एकीकरण समितीने मिरा रोड भागात एक भव्य मोर्चा काढला होता. परंतु मोर्चापूर्वीच मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता. पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर मराठी जनतेने नाराजी व्यक्त केली होती. अखेर दुपारी मराठी मोर्चा निघाला. या मोर्चात ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते. मनसेचे अविनाश जाधव आणि ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे हे देखील या मोर्चात सहभागी झाले. त्यांनी मोर्चा समाप्तीपूर्वी राज्य सरकारवर कडाडून टिका केली.
दरम्यान, मनसेने आता पुन्हा एकदा मिरा भाईंदरमध्ये मराठीची होणाऱ्या गळचेपीवरुन संताप व्यक्त केला आहे. त्यातच, याच मिरा भाईंदरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. सभेपूर्वी मनसेने एक टीजर प्रकाशित केले आहे. यामध्ये ‘वाघ येतोय….मिरा भाईंदरमध्ये…. पाहायला आणि ऐकायला नक्की या… असे यामध्ये म्हटले आहे.
ही सभा मिरा रोड पूर्व येथील आफीस नंबर १०, आकांक्षा इमारत, नित्यानंद नगर समोर शांती गार्डन येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या सभेला ठाणे, मुंबई उपनगरातून मनेसेचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात सहभागी होण्याची शक्यता आहे. नुकतेच मुंबई तक या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा सूत्र लागू होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.