कल्याण – शासन आदेश, नियमांचे पालन न करता, सत्ताधारी शिंदे शिवसेना-भाजप यांचा महापौर कल्याण डोंबिवली पालिकेत सत्तेवर बसेल. यांच्याच पक्षाचेच नगरसेवक प्रभागांमधून निवडून येतील, अशा धर्तीची कल्याण डोंबिवली पालिकेची सत्ताधाऱ्यांंच्या सोयीप्रमाणे करण्यात आलेली चार सदस्यीय प्रभाग रचना आहे, असा आरोप मनसे, काँग्रेस, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेची अंतीम प्रभाग रचना दोन दिवसापूर्वी शासन आदेशाप्रमाणे पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी जाहीर केली. प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या हरकती सूचनांचा विचार करून, चार प्रभागांमधील महत्वाच्या सूचनांची दखल घेऊन त्याप्रमाणे आवश्यक ती दखल घेऊन पालिकेने अंतीम प्रभाग रचना जाहीर केली आहे. अंतीम प्रभाग रचना पालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालयांमध्ये, नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे, असे पालिका उपायुक्त आणि निवडणूक अधिकारी रमेश मिसाळ यांनी सांगितले.
पालिकेने अंतीम प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर काँग्रेस, ठाकरे गट आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या अंतीम प्रभाग रचनेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजप, शिवसेनेने आपल्या सोयीचे उमेदवार प्रभागातून निवडून यावेत. आपल्याच पक्षाचा महापौर पालिकेत सत्तास्थानी बसावा. या विचारातून ही प्रभाग रचना अंतीम केली आहे. शासन आदेशाची पायमल्ली ही प्रभाग रचना अंतीम करताना करण्यात आली आहे, असे आरोप मनसेचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, काँग्रेसचे माजी नगरसेवक सदाशिव शेलार, सामाजिक कार्यकर्ते, राहुल काटकर यांनी केले आहेत.
मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले, अडीच हजाराहून अधिक प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आल्या असताना पालिकेने सुरूवातीला २६४ हरकती आल्याचे जाहीर केले. येथे पहिल्यांदा नागरिकांची पालिकेने दिशाभूल केली. घाईने ही प्रारूप यादी हरकती, सूचनांची गंभीर दखल न घेता अंतीम करण्यात आली आहे. शासन आदेश, नियमांचे उल्लंघन करून अंतीम करण्यात आलेल्या या यादीला आम्ही न्यायालयात आव्हान देणार आहोत.
काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सदाशिव शेलार यांनी सांगितले, विशिष्ट पक्षाचा महापौर पालिकेत सत्ता स्थानी बसावा. आणि ठराविक पक्षांचेचे नगरसेवक प्रभागांमधून निवडून जावेत अशी ही अंतीम प्रभाग रचना आहे. या रचनेमध्ये स्थानिक प्रस्थापित नगरसेवक निवडून येणार नाहीत अशी रचना आहे. त्यामुळे या रचनेला आमचा कडाडून विरोध आहे. याविषयी आम्ही पालिकेत तक्रारी केल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्ते राहुल काटकर यांनी सांगितले, प्रभाग रचना ही पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या सोयीप्रमाणे तयार करण्यात आली आहे. नागरिकांच्या हरकती सूचना फक्त दिवाख्यासाठी ऐकून घेण्यात आल्या. त्याची दखल घेण्यात आली नाही. प्रभाग रचना करताना भौगोलिक, लोकसंख्या आणि सामाजिक समतोलाचा विचार करण्यात आलेला नाही. २७ गावांचा मनमानीने प्रभाग रचनेत समावेश करून स्थानिकांचा विरोध डावलण्यात आला आहे. त्यामुळे ही अंतीम प्रभाग रचना रद्द झाली पाहिजे.
नागरिकांच्या हरकती सूचनांचा विचार करून शासन आदेशाप्रमाणे पालिकेने अंतीम प्रभाग रचना जाहीर केली आहे. पालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये ही प्रभाग रचना नागरिकांना पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. – रमेश मिसाळ, उपायुक्त.