MNS Video Viral: ठाण्यातील कळवा रेल्वे स्टेशनवर झालेला किरकोळ वाद थेट मनसेच्या कार्यालयात पोहोचला. यानंतर ज्या अमराठी महिलेबरोबर वाद झाला, तिला माफी मागण्यास सांगितले गेले. सदर महिलेने माफी मागितल्यानंतरही तिच्या कानशिलात लगावण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला. सदर व्हिडीओ मनसेचे पदाधिकारी विनायक बिटला यांच्या फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. मात्र या व्हिडीओवर आता संमिश्र प्रतिक्रिया येत असून काहींनी याला पाठिंबा दिला आहे तर काही जणांनी यावर टीकाही केली आहे.
विनायक बाटला यांच्या कार्यालयातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला कळवा स्थानकावर घडलेला प्रसंग कथन करते. तसेच माझ्याकडून चुकून अपशब्द काढले गेले, मी हात उचलण्याचा प्रयत्न केला, असेही कबूल करते. सदर कृत्याबाबत ती दिलगिरी व्यक्त करते, त्यानंतर बाजूलाच बसलेली मनसेची महिला पदाधिकारी त्या महिलेच्या कानशिलात लगावते.
नेमके प्रकरण काय?
मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवा रेल्वे स्थानकावर गर्दीच्या वेळी लोकल ट्रेनमधून उतरताना मनसेच्या पुरूष कार्यकर्त्याचा चुकून सदर महिलेला धक्का लागला. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. पुरूष कार्यकर्त्याने धक्का लागल्याबद्दल माफी मागितली. मात्र तरीही संबंधित महिलेने वाद घालून अपशब्द वापरले, मराठी लोकांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला गेला.
या प्रकारानंतर संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्याच्या पत्नीने यासंबंधीची तक्रार पोलिसांत दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी विनंती केल्यामुळे सदर प्रकरण मनसे कार्यालयात पोहोचले. तिथे या महिलेला कानशिलात लगावण्यात आली.
पाहा व्हिडीओ –
कळवा स्थानकावर वाद घालणाऱ्या महिलेने माफी मागताच तिच्या कानशिलात लगावली गेली. कानशिलात लगावणाऱ्या महिलेने व्हिडीओत म्हटले की, माझा नवरा अर्धा तास रेल्वे स्टेशनवर छळ सहन करत होता. महिलांच्या बाजूने कायदे असल्यामुळे तो शांत राहिला. पण आम्ही मराठी माणसाबद्दलचे अपशब्द खपवून घेणार नाही. आम्ही या महिलेविरोधात पोलिसांत तक्रार करणार होतो. पण तिची मुलगी आणि कुटुंबाकडे पाहूण आम्ही तिला केवळ समज देऊन सोडत आहोत.
या व्हिडीओला मनसे पदाधिकाऱ्या पेजवर १३ लाख व्ह्यूज आणि अडीच हजाराहून अधिक कमेंट आल्या आहेत. यातील बहुसंख्य कमेंट मनसेच्या बाजूने आहेत. तर विशेष बाब म्हणजे काहींनी सदर प्रकारावर असहमतीही दर्शवली आहे. माफी मागितल्यानंतर महिलेवर हात उचलायला नको होता, असे काहींचे म्हणणे आहे. एका युजरने म्हटले की, ती महिला वृद्ध होती, तिच्यावर हात उचलायला नको होता.
पाहा काही कमेंट्स –

या व्हिडीओवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना त्यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्या म्हणाल्या, आपला देश संविधानावर चालतो. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी. कुणालाही अशाप्रकारे मारण्याचा अधिकार नाही.