ठाणे : पूर्व द्रुतगती मार्गावरुन प्रवास करताना सावधान.. कारण तुमच्या हातातील मोबाईल चोरटे केव्हा जबरीने खेचून नेतील हे सांगता येत नाही. येथील कॅडबरी जंक्शन ते माजिवडा मार्गावर रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हेरून त्यांच्या हातातील किमती मोबाईल खेचण्याचे प्रकार वाढत आहेत. काही वर्षांपूर्वी मोबाईल चोरट्यांचा प्रतिकार करताना रिक्षातून पडून एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे पुन्हा अशी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावरून दिवसाला हजारो वाहने मुंबईहून ठाणे, घोडबंदर, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करतात. परंतु मागील दोन महिन्यांपासून या मार्गावरील कॅडबरी जंक्शन ते माजिवडा या भागात मोबाईल चोरी होण्याचे प्रमाणा वाढू लागले आहे. १ एप्रिल ते १७ जून या कालावधीत लाखो रुपये किमतीचे सहा मोबाईल चोरीला गेले आहेत. मोबाईल चोरी करताना अतिशय जीवघेणा प्रकार होत आहे. रिक्षातून प्रवास करणाऱ्यांना मोबाईल चोरटे लक्ष्य करत आहेत. एखाद्या प्रवाशाच्या हातात मोबाईल असल्यास दुचाकीवर आलेले चोरटे त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावितात. मोबाईल खेचताना चोरट्यांकडून हातावर फटका मारला जातो. त्यामुळे एखाद्या प्रवाशाने मोबाईल धरून ठेवल्यास त्याच्या जीवावरही बेतण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणांमध्ये राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मोबाईल चोरी केल्यानंतर दुचाकी चोरटे भिवंडी किंवा मुंबईच्या दिशेने दुचाकीने पळून जातात. त्यामुळे त्यांचा पाठलाग करणे कठीण होते असे मोबाईल चोरी झालेल्या एका व्यक्तीने सांगितले.
मोबाईल चोरीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.आशुतोष डुंबरे, आयुक्त, ठाणे पोलीस.
१६ मार्चला माझा दोन लाख रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेला होता. या मोबाईलमध्ये महत्त्वाचे संपर्क क्रमांक तसेच इतर माहिती होती. या प्रकरणाचा तपास अद्यापही लागलेला नाही. माझा मोबाईल चोरी झाल्यानंतर या भागात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली होती. परंतु सीसीटीव्ही देखील लागलेले नाही. वारंवार त्याच भागात या घटना घडत आहेत. प्रशासनाने येथे लक्ष देणे आवश्यक आहे. – संकेत कोर्लेकर, अभिनेता.
मोबाईल चोरीच्या घटना
१ जून या एकाच दिवशी तीन मोबाईल चोरीला गेले. यामध्ये ॲपल कंपनीचे आयफोन १६, आयफोन १५ प्रो आणि एक विवो कंपनीचा असे एकूण १ लाख ५५ हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरीला गेले.
१० मे या दिवशी ॲपल कंपनीचा आयफोन १२ हा मोबाईल चोरीला गेला.
६ मे या दिवशी सॅमसंग कंपनीचा ६० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेला.
१५ एप्रिल या दिवशी आयफोन १६ प्रो हा मोबाईल चोरीला गेला.
२०२१ मध्ये २७ वर्षीय तरुणी महामार्गावरून रिक्षाने प्रवास करत होती. या तरुणीचा देखील मोबाईल चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणीने चोरट्यांचा प्रतिकार केला असता, तिचा रिक्षातून पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे ठाण्यात पुन्हा अशी घटना घडण्याची भिती व्यक्त होत आहे.