ठाणे : घोडबंदर येथील पातलीपाडा भागात रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या हातातील महागडा मोबाईल दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी खेचून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नवी मुंबई येथील कामोठे भागात महिला राहते. त्यांचा लग्नसमारंभात मेकअप करण्याचा व्यवसाय आहे. त्यांना वसई येथे बोलाविण्यात आल्याने त्या शनिवारी दुपारी वसई येथे गेल्या होत्या. तेथील काम आटोपल्यानंतर त्या बसगाडीने घोडबंदर येथील पातलीपाडा पर्यंत बसगाडीने आल्या. रात्री ११ वाजता त्या पातलीपाडा बस थांबा येथे उतरल्यानंतर त्यांनी रिक्षातून नवी मुंबई येथे प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी रिक्षाने प्रवास सुरु केला. रिक्षाच्या डाव्या बाजूच्या दिशेने त्या बसल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या हातामध्ये ६० हजार रुपये किमतीचा मोबाईल होता. त्या रिक्षाने हिरानंदानी पार्क येथे आल्या असता, एका दुचाकीवर दोन चोरटे आले. त्यांनी तिच्या हातातील मोबाईल खेचला आणि तेथून निघून गेले. यानंतर महिलेने याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे शहरात मोबाईल हातातून खेचून नेण्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. मुख्य महामार्ग, मार्गावरून रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हेरून हे चोरटे प्रवाशांचा मोबाईल चोरतात. यापूर्वी पूर्व द्रुतगती महामार्गावर अशा घटना घडल्या आहेत. त्यानंतर आता घोडबंदर मार्गावर हा प्रकार घडल्याने चोरट्यांवर वचक केव्हा बसणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.