आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाने जागतिक महिला दिनाचे निमित्त साधत शहरातील ज्येष्ठ कवयित्री गीता गुप्ते यांचा सत्कार केला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैदेही दफ्तरदार यांनी गुप्ते यांचा ‘आधुनिक बहिणाबाई’ अशा शब्दांत गौरव केला. गीता गुप्ते यांनी यावेळी त्यांचा जीवनानुभव उपस्थित महाविद्यालयीन तरुणींपुढे मांडला व बोधामृतसारखी कविता ही आजच्या पिढीतील तरुणींना उत्तमरीत्या लागू होते, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच विद्यार्थिनींना त्यांच्या अडीअडचणीच्या काळात स्त्रीवादी कविता नक्कीच तारून नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिवजन्मावरील वाद, आई, मराठी दिन आदी कविता सादर केल्या. त्यांनी सादर केलेली ‘सर्वात महागडी शाळा अनुभवाची असते’ ही कविता उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवून गेली. डॉ. दप्तरदार यांनी महिला दिनानिमित्त बोलताना विद्यार्थिनींना नोबेलविजेत्या मलाला युसुफझाई हिची आठवण करून देत तिच्या लढय़ातून बोध घ्या व तिच्या पावलावर पाऊल टाकण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका व महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला, तर प्रीती शेलार या विद्यार्थिनीचा क्रीडा नैपुण्याबद्दल गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. विद्युत जोशी यांनी केले.