ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत दिवाळी निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी तीनशेहून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. बुधवारी उशीरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यामुळे या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. पालिका आणि पोलिसांकडून ही सुमोटो कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे फटाक्यांची आतषबाजी अनेकांना महागात पडल्याचे चित्र आहे.

दिवाळी काळात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषणात वाढ होते. आधीच मुंबई महानगरातील हवेचा दर्जा खालावलेला असून त्यात दिवाळी कालावधीत फटाके आतषबाजीमुळे हवेचा दर्जा आणखी खालावण्याची भिती व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी दिली होती. परंतु या वेळेनंतरही शहरात फटाक्यांची आतषबाजी सुरूच असल्याचे समोर आले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर ठाणे पोलिसांकडून तीन दिवसांपासून सुमोटो गुन्हे दाखल करण्यात येत आहे. रात्री १० वाजेनंतर पोलिसांची पथके शहरात गस्त घालत असून यादरम्यान फटाके फोडताना आढळून येणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले जात आहे. तसेच रात्री उशीरापर्यंत फटाके फोडणाऱ्यांविरोधात पालिका प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त होत असून त्या तक्रारी पालिका पोलिसांकडे पाठवित आहे. त्यानुसारही गुन्हे दाखल केले जात आहेत. काही ठिकाणी दंडात्मक कारवाई केली जात आहे. लहान मुले फटाके फोडताना आढळून आले तर त्यांच्या पालकांना समज दिली जात आहे. तसेच बेकायदेशिरीत्या फटाके विक्री करणाऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल केले जात आहेत. अशाप्रकारे गेल्या तीन दिवसांत ठाणे पोलिसांनी तीनशेहून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. ठाणे,कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा >>>कल्याण-डोंबिवलीत तीन दिवसात फटाक्यांचा १४ टन कचरा जमा

वाढत्या प्रदूषणामुळे दिवाळीच्या काळात फटाके फोडणाऱ्यांसाठी उच्च न्यायालयाने वेळ मर्यादा निश्चित करून दिली होती. मात्र ही वेळ मर्यादा पाळणाऱ्या ४९ जणांवर उल्हासनगर शहरात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उल्हासनगर महापालिका आणि पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. प्रदूषण टाळण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत १९० बांधकामांना पालिकेने नोटीस बजावली असल्याचेही त्यांनी सांगितले.