ठाणे : युद्धजन्य परिस्थिती असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने दक्ष राहावे अशी सूचना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली. शुक्रवारी नरेश म्हस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. त्यावेळी म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच फलाटांवर नव्याने छतांची उभारणी, पंखे, वाढीव आरक्षण खिडक्या, वातानुकूलीत प्रतीक्षा कक्ष उभारण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

ठाणे रेल्वे स्थानकात सुरु असलेल्या विकासकामांचा आढावा तसेच प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज आठ लाख प्रवासी प्रवास करतात. रेल्वे प्रवाशांच्या समस्या, विकासकामे, प्रस्तावित कामांबाबत मी निवडून आल्यापासून वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांसोबत पाठपुरावा करत आहे. ठाणे स्थानकात नव्याने वातानुकूलीत प्रतिक्षा कक्ष उभारला जात असून येत्या जुलै महिन्यात त्याचे लोकर्पण अपेक्षित आहे. आठ सरकते जिने प्रवाशांच्या सेवेत असून दोन सरकते जिने लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी माध्यमांना दिली.

ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटांवरील नव्याने छत बदलण्याचे काम वेगाने सुरु आहे. एका रेल्वे पादचारी पूलाचे काम सुरु असून लवकरच ते मार्गी लागणार आहे. उन्हाळ्याची सुट्टी पडली असून मोठ्या संख्येने प्रवासी त्यांच्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणार असल्याने तातडीने दोन वाढीव आरक्षण खिडक्या सुरु करण्यात येणार आहेत. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करणे, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे पोलीस सज्ज असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.

ठाणे आणि मुलंड रेल्वे स्थानकादरम्यान नव्या स्थानकाची उभारणी केली जाणार आहे. कायदेशीर अडचण आल्याने त्याचे काम खोळंबले आहे. मात्र त्यातून तोडगा लवकरच निघणार असून नवीन रेल्वे स्थानकाची उभारणी झाल्यावर ठाणे रेल्वे स्थानकावरचा मोठा ताण कमी होणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी पाहता दोन ते तीन तास विकासकामे करायला अधिकाऱ्यांना वेळ मिळतो. अतिशय कमी वेळेत रेल्वेचे अधिकारी काम करत असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.