ठाणे : युतीचे काम चांगल्याप्रकारे सुरू असताना केवळ क्षुल्लक कारणावरून एखाद्या वरिष्ठ पोलिस निरिक्षकावर कारवाई होत नाही तोपर्यंत शिवसेनेला मदत करायची नाही आणि कल्याण लोकसभेचा उमेदवार आम्हीच ठरवू अशा स्वरुपाचा ठराव केला जातो. अशी आव्हाने देण्यापुर्वी विचार करायला हवा आणि अशी आव्हाने आम्हाला देऊ नका, असा इशारा मुख्यमंत्री पुत्र व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिला आहे. दहा महिन्यांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाऊले उचलली नसती तर काय परिणाम झाले असते, याचाही विचार भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी करायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण लोकसभा मतदार संघात भाजप कायकर्ते सांगतील, तोच उमेदवार मान्य केला जाईल. अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही, अशी भुमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यावर आता खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्रात पुन्हा भाजप- शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे हेच आमचे ध्येय आहे. त्या दिशेने आम्ही करत असलेल्या कामांना जर कुणाचा विरोध असेल, कुणाला पोटदूखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर माझी पदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा आमचा आणि देशातील तमाम जनतेचा निर्धार आहे. त्यासाठी आम्ही प्राणपणाने प्रयत्न करू. परंतु, काही क्षुल्लक कारणांसाठी शिवसेना – भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा >>>Mira Road Murder : “मनोज साने माझा मामा आणि तो खूप…”, सरस्वती काय म्हणाली होती? अनाथ आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी दिलं उत्तर

कल्याण लोकसभा मतदार संघामधून नागरिकांनी मला मोठ्या मताधिक्याने निवडुण दिले. तेव्हापासून शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जाण्यासाठी काम करतोय. उल्हासनगरमध्ये केवळ भाजपच्या नगरसेवकांना ५५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे काम केले आहे. त्याचा अद्यादेश निघाला असून या कामाच्या निविदा लवकरच निघतील. त्यामुळे कोणीही क्षुल्लक कारणावरून युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांनी युतीसाठी काम केले पाहिजे आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी काम केले पाहिजे. मला व्यक्तीशः कोणत्याही पदाची लालसा नाही. येत्या लोकसभेच्या निवडणूकीत कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय शिवसेना – भाजप युतीचे वरिष्ठ नेते घेतील. मला उमेदवारी दिली नाही तरी जो कुणी उमेदवार असेल, त्याचा एकदिलाने आम्ही प्रचार करू आणि त्याला विजयी करू, असेही त्यांनी म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp shrikant shinde warning to local office bearers of bjp amy
First published on: 09-06-2023 at 21:20 IST