ठाणे – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडले. नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार दि बा पाटिल यांचे नाव देण्याबाबत साधा उल्लेखही केला नसल्याने भुमिपुत्रांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामांनी विमानतळाला दिबांचेच नाव लागावे यासाठी नुकतीच भुमिपुत्रांसोबत बैठक घेतली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाला माजी खासदार दि .बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी २०२१ पासून रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पालघर या सागरी जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांकडून केली जात आहे. यासाठी दि.बा. पाटील सर्वपक्षीय नामकरण समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून राज्य आणि केंद्र सरकार तसेच केंद्रीय विमान उड्डायन मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे. यासाठी अनेक मोर्चे, आंदोलने भुमिपुंत्रांनी केली. यापुर्वी ३० सप्टेंबर रोजी अचानकपणे विमानतळाकरता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाने परवाना जारी करण्यात आला. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे आपली फसगत झाल्याची भावना, नामकरणासाठी आग्रही असणाऱ्या संघटनाची झाली.

दि. बा.पाटलांचे नाव देण्याबाबत लोकभावना सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी ६ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत लाँग मार्च काढणयाचा इशारा भिवंडीचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी दिला होता. परंतु विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर भूमिपूत्रांनी आंदोलन स्थगित केले होते. तर, खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली कार रॅली पार पडली होती. मात्र, नवी मुंबई विमानतळाचे ८ ऑक्टोबर रोजी मोठ्या थाटामाटात उद्घाटन पार पडले. उद्घाटनावेळी विमानतळाला दिबांचे नाव दिले जाणार असा उल्लेख देखील केला नसल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली. दरम्यान, भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत भुमिपुंत्रांची बैठक पार पडली.

बैठकीत नेमके काय झाले

खासदार सुरेश म्हात्रे यांनी भूमिपुत्रांची बैठक घेतली. नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटिल यांचे नाव देण्यासंदर्भात ३ डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून ६० दिवस आंदोलन केले जाणार नाही. मात्र दिबांचे नाव दिले नाही तर ३ डिसेंबरला लाखोंच्या संख्येने भूमिपुत्र आंदोलन करणार असे माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली.