ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम रविवारी ठाणे ते कळवा या दोन रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले. या वेळी नवीन मार्गावरुन इंजिन चालवण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर धीम्या उपनगरीय रेल्वेगाड्या या मार्गावरुन सोमवारपासून सुरु झाल्या आहेत. मात्र रेल्वे मार्ग नवीन असल्याने गाड्यांचा वेग कमी ठेवण्याच्या सूचना असल्याने या कामानंतर सलग तिसऱ्या दिवशीही या मार्गावरुन होणारी रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरु असल्याचं दिसून येत आहे. बुधवार, म्हणजेच १२ जानेवारी २०२२ रोजी अप मार्गावरील मुंबई सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व लोकल ट्रेन या २० ते २५ मिनिटं उशिराने धावत आहेत. ठाकुर्लीहून ५.३८ वाजता सुटलेली लोकल ट्रेन कळव्याला ६.५४ ला पोहचली.

दिवा आणि कळव्यादरम्यान नवीन मार्गिकेवरुन गाडीचा वेग कमी ठेवा अशा रेल्वेच्या सूचना आहेत. त्याचा ही हा परिणाम असल्याची माहिती रेल्वेतील सुत्रांनी दिलीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी रेल्वे प्रशासनाने ठाणे खाडीवर बसविलेल्या दोन नव्या लोखंडी तुळईवरील रेल्वे रुळांवरून प्रायोगिक तत्त्वावर इंजिन चालविले. हा प्रयोग यशस्वी झाल्याने सोमवारपासून खाडीवरील नव्या रेल्वे रुळावरून धिम्या उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरू होणार आहे. ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. ठाणे आणि कळवा येथील तांत्रिक कामासाठी रेल्वे प्रशासनाने ३६ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. या कामासाठी रेल्वेचे ८०० अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मेगाब्लॉक दरम्यान ठाणे आणि कळवा रेल्वे स्थानकांदरम्यान जुन्या आणि नव्या रुळांची जोडणी करण्यात आली. तसेच काही तांत्रिक दुरुस्ती केली गेली.