ठाणे – मुंबई महानगर क्षेत्र वाहतूक कोंडी मुक्त व्हावे यासाठी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या सल्लागार कंपनीला महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. ही कंपनी वाहतूक तज्ज्ञांनासोबत घेऊन अभ्यास करणार आहे. यासाठी एमएमआरडीएने एक एआयचा वापर करुन सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरच्या मार्फत ड्रोनच्या माध्यमातून सर्वे होणार आहे. यामुळे एमएमआरए क्षेत्रातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर होईल, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समिती बैठकीत वार्षिक योजनेचा आढावा, प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विकास, शाळांचे स्मार्ट शाळांमध्ये रुपांतर अशा विविध विषयांसह मुंबई महानगर क्षेत्रात होत असलेल्या वाहतूक कोंडी बाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली. ही कोंडी सोडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर देखील चर्चा झाली.
ही बैठक पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीत कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली याविषयी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. मुंबई महानगरातील कोंडी सोडविण्यासाठी एआयचा वापर केला जाणार असे शिंदे यावेळी म्हणाले.
ही कोंडी सोडविण्याची जबाबदारी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या कंपनीला दिली आहे. या सल्लागार कंपनीने त्यानुसार काम सुरु केले असून त्यांनी एआयचा वापर करुन सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यामुळे ही कोंडी कायमस्वरुपी दूर होणार आहे, असा दावा शिंदे यांनी केला.
मेट्रो, बोरिवली बोगदा यांसारख्या इतर प्रकल्पांमुळे देखील वाहतूक कोंडी सोडण्यास मदत होणार आहे. मास्टिकने रस्ते व्यवस्थित करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. तसेच ३९ पर्यटन स्थळांना मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली.