ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील मानकोली भागात मंगळवारी पहाटे सळई वाहून नेणाऱ्या कंटेनरचे चाक फुटले. या अपघातामुळे मुंबई नाशिक महामार्ग आणि ठाण्यात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ठाणे वाहतूक पोलिसांकडून येथील अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू आहे. परंतु सकाळी ८.३० नंतरही हे कार्य पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे मानकोली ते ठाण्यातील घोडबंदर येथील मानपाडा आणि मुंब्रा शहरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सकाळी कामानिमित्त बाहेर पडणारे नोकरदार आणि शाळेत निघालेले विद्यार्थी वेळत पोहोचू शकले नाहीत. वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने चालवू लागल्याने कोंडीत भर पडली.

मुंबई नाशिक महामार्गावरून कंटेनर ठाण्याहून भिवंडीच्या दिशेने वाहतूक करत होता. या कंटेनरमध्ये मोठ्याप्रमाणात सळया होत्या. कंटेनर पहाटे पाच वाजताच्या सुमारास मानकोली येथील कसबा ढाबा परिसरात आला असता, या कंटेनरचे चाक फुटून वाहन चालकाचे नियंत्रण सुटले. या अपघातात कंटेनरमधील सळया रस्त्यावर पडल्या. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ठाणे वाहतूक पोलिसांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त कंटेनरला क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. परंतु ते शक्य झाले नाही.

हेही वाचा – जलवाहतूक प्रकल्पाची अंमलबजावणी संथ गतीने, कामाला गती देण्याची खासदार नरेश म्हस्के यांची मागणी

हेही वाचा – ५६४ पाणथळींचे भवितव्य नव्या सरकारच्या हाती!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सकाळी ७.३० नंतर वाहनांचा भार या महामार्गावर वाढू लागला. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली. त्यातच, या भागात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्याचा परिमाम वाहतूक व्यवस्थेवर झाला. सकाळी ८.३० वाजता येथील मानकोली ते मानपाडापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. तसेच मुंब्रा भागातूनही अनेक वाहने मुंबई नाशिक महामार्गावर येत असतात. या मार्गावरही मुंब्रा बाह्यवळणापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे सकाळच्या वेळेत घराबाहेर पडलेले नोकरदार आणि शाळेत जाणारे विद्यार्थी कोंडीत अडकले.