लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: येथील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर स्टडीज (आयएमसीओएसटी) या महाविद्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे काही विद्यार्थ्यांना तब्बल तीन वर्ष त्यांच्या पदवी शिक्षणाचा निकाल दिला नसल्याचे काही आठवड्यांपूर्वी समोर आले होते. याबाबत विद्यार्थ्यांनी मनविसेच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठाकडे तक्रार केली होती. विद्यार्थ्यांच्या या तक्रारीच्या आधारे विद्यापीठाने सबंधित महाविद्यालयाला या प्रकरणी १ लाख १० हजारांचा दंड ठोठावला आहे.

ठाण्यातील आयएमसीओएसटी या महाविद्यालयातून चार वर्षांपूर्वी कृतिका राठोड आणि मलायेल बवाचन या विद्यार्थ्यांनी बीएमएस अभ्यासक्रमाची अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती. कृतिका दोन विषयात अनुत्तीर्ण झाली होती. मात्र त्याची गुणपत्रिका तिला मिळाली नाही. अनुत्तीर्ण झालेले दोन विषय सोडविण्यासाठी तिने पुन्हा अर्ज केला होता. नवीन अभ्यासक्रम सुरू झाल्याने सर्व विषयांची परीक्षा देण्यास महाविद्यालयाने तिला सांगितले होते. त्यानुसार ऑक्टोबर २०२० मध्ये ऑनलाइन परीक्षा देऊन ती उत्तीर्णही झाली.

हेही वाचा… कल्याणमध्ये पारनाक्यावर रिक्षेच्या धडकेत महिला गंभीर जखमी

मात्र यानंतर ही विद्यापीठाने गुणपत्रिका देण्यास नकार दिला. असाच अनुभव मलायेल बवाचन या विद्यार्थ्यालाही आला. याबाबतची तक्रार दोन्ही विद्यार्थ्यानी ठाणे मनविसेचे संदीप पाचंगे यांच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठाकडे लेखी पद्धतीने तक्रार केली होती. यानंतर मुंबई विद्यापीठाकडून प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली. या संपूर्ण प्रकरणात महाविद्यालयाचा दोष असल्याने मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयाला विद्यापीठाची पूर्व परवानगी न घेता या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमात प्रवेशित केल्यामुळे प्रत्येकी ३० हजार तसेच परीक्षेस प्रविष्ठ केल्यामुळे २५ असा एकूण एका विद्यार्थ्यांसाठी ५५ हजारांचा दंड आकरण्यात आला असून दोन्ही विद्यार्थ्यांसाठी १ लाख १० हजारांचा दंड कॉलेजला ठोठावला असल्याचे मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रकार नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा… डोंबिवलीत गावदेवी जवळील बेकायदा इमारत तोडण्यासाठी पुरेसे पोलीस बळ द्या; उच्च न्यायालयाचे शासनाला आदेश

या संपूर्ण प्रकरणाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इर्शाद काझी यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. गुणपत्रिका नसल्यामुळे विद्यार्थ्यांना कुठेही नोकरी मिळाली नाही यासाठी सर्वस्वी जबाबदार महाविद्यालय आहे. त्यामुळे मुलांना नुकसान भरपाई म्हणून गेल्या ४ वर्षाचा पगार महाविद्यालयाने द्यावा अशी मागणी संदीप पाचंगे यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविद्यलयाला विद्यापीठाने दंड ठोठवल्याचे वृत्त समजले. मात्र अदयाप मला संबंधित विद्यालय आणि मुंबई विद्यापीठाकडून गुणपत्रिका मिळालेली नाही. गुणपत्रिका लवकरात लवकर मिळावी. – कृतिका राठोड, विद्यार्थिनी