बदलापूर: एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने बदलापुरात आपल्या राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बदलापुरात समोर आली आहे. हे टोकाचे पाऊल कर्मचाऱ्याने का उचलले याची माहिती मिळू शकली नाही.
शहरात एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह असताना दुसरीकडे ही घटना घडली. शुक्रवारी रात्री साडे ९ वाजण्याच्या सुमारास बदलापूर पश्चिम भागातील नक्षत्र वेदांत या इमारतीत हा प्रकार घडला. या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या मुंबई पोलिस दलातील ३६ वर्षीय महिला पोलिस कॉन्स्टेबलने रात्री कर्तव्यावरून घरी परतल्यानंतर राहत्या घराच्या गॅलरीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
या ३६ वर्षीय महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या पतीचे कोरोना काळात निधन झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात एडीआर दाखल करण्यात आला असून या महिलेने आत्महत्या करण्यामागे नेमके कोणते कारण होते, याचा पोलिस तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे.