ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांनी एका व्यापाऱ्याच्या घरी छापा टाकून ६ कोटी रुपये लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सात पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. यामुळे ठाणे पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. निलंबित करण्यात आलेल्या प्रत्येक पोलिसाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. याप्रकरणी इब्राहिम शेख नावाच्या व्यक्तीनं गृहमंत्रालयाला पत्र लिहिल्यानंतर याचं बिंग फुटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?
मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी भागात खेळण्याचे व्यापारी फैजल मेमन राहतात. १२ एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास मुंब्रा पोलिसांनी त्यांच्या घरी छापा टाकला होता. यावेळी पोलिसांना त्यांच्या घरात ३० बॉक्समध्ये ३० कोटींची रोकड आढळली. प्रत्येक बॉक्समध्ये एक कोटी प्रमाणे पोलिसांनी सर्व बॉक्स मुंब्रा पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी खेळणे व्यापारी फैजल मेमन यांना दमदाटी करून त्यांच्याकडून ६ कोटी रुपये उकळले, असा आरोप गृहमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात करण्यात आला आहे.

पोलिसांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात आणलेल्या ३० बॉक्सपैकी ६ बॉक्स म्हणजेच ६ कोटी रुपये काढून घेतले आणि उर्वरित २४ कोटी रुपये खेळणे व्यापारी फैजल मेमन यांना परत दिले. व्हायरल झालेल्या पत्रातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर, ३ पोलीस अधिकाऱ्यांसह ७ अन्य पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे, रवी मदने, हर्षल काळे आणि पोलीस नाईक पंकज गायकर, जगदीश गावित, दिलीप किरपण, प्रवीण कुंभार, अंकुश वैद, ललित महाजन आणि नीलेश साळुंखे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावं आहेत. निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एकाच वेळी दहा पोलिसांना निलंबित केल्यानं मुंब्रा पोलीस ठाणं रिकामं झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच हे प्रकरण थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गेल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.