परिसरातील व्यापाऱ्यांना बांधकामे हटवण्यासाठी आठ दिवसांची मुदत
मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून गणल्या जाणाऱ्या ठाणे स्थानक परिसराकडे येणाऱ्या रस्त्यांवर नित्यनेमाने होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता पावले उचलली आहेत. स्थानक परिसरातील सुभाष रोड तसेच छत्रपती शिवाजी महाराज मार्गाच्या रुंदीकरणाची कामे येत्या १ मार्चपासून सुरू करण्यात येणार असून, या मार्गाच्या आड येणारी बांधकामे त्यापूर्वी हटवण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी परिसरातील व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. विकास आराखडय़ातील नोंदीप्रमाणे या रस्त्यांची लांबी-रुंदी ठेवण्यात येणार असल्याचेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी महापालिकेने काही वर्षांपूर्वी सॅटिस प्रकल्पाची उभारणी केली. मात्र सॅटिसची बांधणी काहीशी सदोष असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असून या प्रकल्पाच्या उभारणीनंतरही या परिसरातील वाहतूक कोंडी अद्याप कायम आहे. सॅटिसवर जागोजागी बसणारे फेरीवाले, रस्त्यांच्या कडेला झालेली बेकायदा बांधकामे, दुकानदारांनी हद्द ओलांडून केलेले अतिक्रमण यामुळे येथील वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे. खुद्द जयस्वाल यांच्या आदेशानंतरही सॅटिस परिसरातील फेरीवाले हटविले जात नाहीत, असा अनुभव आहे. हे लक्षात घेऊन साधारण पंधरवडय़ापूर्वी जयस्वाल यांनी सुभाष पथ, शिवाजी पथ, जुना रेल्वे स्थानक रस्ता या परिसराची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी या परिसरातील गर्दी आणि वाहतूक समस्येचे निराकरण करण्यासाठी येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. हे रुंदीकरण करताना येथील बेकायदा बांधकामांवर मोठय़ा प्रमाणावर कारवाई केली जाणार आहे. मात्र, या परिसरातील नागरिकांनी तसेच व्यावसायिकांच्या मोठय़ा गटाने नुकतीच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन बांधकामे हटविण्यास वेळ मागितला होता. व्यापाऱ्यांची मागणी लक्षात घेऊ न जयस्वाल यांनी त्यांना १ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. १ मार्चपर्यंत व्यापाऱ्यांनी स्वत:हून आपली बाधित बांधकामे काढून न घेतल्यास महापालिकेमार्फत ती काढण्यात येतील असेही महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रुंदीकरणाचे काम पूर्ण करून डांबरीकरण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. पावसाळ्यात रेल्वे स्थानक रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असते, त्यामुळे ठाणेकरांना येत्या पावसाळ्यात दिलासा मिळावा, असा महापालिकेचा प्रयत्न आहे, असा दावा जयस्वाल यांनी पत्रकारांशी बोलताना केला.