अंबरनाथ : प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर अंबरनाथमध्ये शिवसेनेतील गटबाजीवर चर्चा केली जाते. मात्र यंदा पालिका निवडणुकीच्या तोंडावर अंबरनाथ शहरातील आमदार बालाजी किणीकर आणि माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्यातील गटबाजीची चर्चा सुरू होताच वाळेकर यांनी यावर पूर्णविराम दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या सभेत अरविंद वाळेकर यांनी आमच्यात कोणतीही गटबाजी नाही, तर स्पर्धा आहे असे स्पष्ट केले. स्पर्धेमुळे शहरात विकासकामे करण्याची संधी मिळते आणि त्याचा नागरिकांसह पक्षालाही फायदा होतो, असेही वाळेकर म्हणाले. त्यामुळे पालिका निवडणुकांच्या तोंडावर वाळेकर आणि किणीकर यांच्यातील वाद मिटण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

अंबरनाथ शहरात महायुतीतील शिवसेना पक्षाचे वर्चस्व आहे. मात्र गेल्या काही वर्षात अंबरनाथमध्ये शिवसेनेत दोन गट उघडपणे दिसून आले. अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि माजी नगराध्यक्ष तसेच शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यात सातत्याने संघर्ष पाहायला मिळाला आहे. कधी विकासकामांवरून तर कधी आव्हान देताना हा संघर्ष अनेकदा दिसून आला. या संघर्षात वरिष्ठांना हस्तक्षेप करावा लागतो. त्याचा पक्षाच्या यशावर परिणाम झालेला नाही. मात्र त्यामुळे विरोधक उचल खात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे या गटबाजीला रोखण्यासाठी प्रयत्न होताना दिसतात.

येत्या २ डिसेंबर रोजी अंबरनाथ नगरपालिकेसाठी मतदान संपन्न होईल. यासाठी येत्या १० नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात होईल. यंदा थेट नगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे. त्यासाठी माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यासुद्धा स्पर्धेत आहेत. वाळेकर गटाने शहरात शिवसेनेची कामे लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी प्रचारही सुरू केला आहे. त्यातीलच एका सभेत किणीकरांसोबतच्या वादावर पहिल्यांदाच शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी उघडपणे वक्तव्य केले आहे. किणीकर यांचे नाव न घेता त्यांनी आमच्यात कोणतीही गटबाजी नाही, असे सभेत उपस्थित असलेल्या जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासमोर स्पष्ट केले आहे. आमच्यात कोणतीही गटबाजी नाही, तर स्पर्धा आहे. त्यामुळे शहरात विकासकाम करण्याची संधी मिळते. नागरिकांना आणि पक्षालाही त्याचा फायदा होतो, असेही वाळेकर पुढे बोलताना म्हणाले.

विशेष म्हणजे यापूर्वीच्या अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये एकमेकांना बॅनरवरसुद्धा स्थान दिले जात नव्हते. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाळेकरांच्या बॅनरवर आमदार बालाजी किणीकर यांचे छायाचित्र लावले जाते आहे. तसेच कार्यक्रमांमध्ये अरविंद वाळेकर यांच्याकडून आमदार बालाजी किणीकर यांचा सन्मानजनक उल्लेखही केला जातो आहे. त्यामुळे पालिका निवडणुकांच्या तोंडावर वाळेकरांकडून संघर्ष संपवण्याची भाषा केली जात असल्याचे दिसते आहे.

विधानसभेत किणीकरांनी घेतलेला पुढाकार

विधानसभा निवडणुकीत आमदार बालाजी किणीकर यांनी मतभेद संपवण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यावेळी वाळेकरांचे वर्चस्व असलेल्या शिवसेना शाखेत जात त्यांनी जुन्या गोष्टींवर दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही दोन्ही गटांमध्ये तितकेसे मनोमीलन पाहायला मिळाले नव्हते. त्यावेळी आमदार किणीकर यांना पाठिंब्याची आवश्यकता होती. आता वाळेकर यांना पाठिंब्याची आवश्यकता असल्याने त्यांनी यात पुढाकार घेतल्याचे किणीकर समर्थकांनी सांगितले आहे.